Friday, February 28, 2025

कृषि विज्ञान केंद्रांनी ‘मालआधारित’ कृती आराखडा राबवावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी कार्यशाळेचा यशस्वी समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय आणि अटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप २८ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर,  मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कार्यशाळेतील मंथनातून निघालेल्या मुद्द्यांवर समाधान व्यक्त करून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कृषि विज्ञान केंद्रांच्या आगामी कृती आराखड्यात कृषि माल आधारित (Commodity Base) दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित कृती आराखडा तयार करून पीक, पशुधन, रेशीम, मधुमक्षिका अशा विविध घटकांवर उद्योजकता विकासावर भर द्यावा. यामध्ये यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञानाचा समावेश करून शेतकरीहित साधण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

"शेतीसाठी जशी पाण्याची गरज आहे, तशीच ज्ञानाचीही गरज आहे. हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य कृषि विज्ञान केंद्रांनी करावे. तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबत पीकनिहाय शाश्वत उत्पादनासाठी मानके आणि मापदंड निश्चित करावेत. तसेच प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने एक विशेष कार्यक्षेत्र ठरवून आपली वेगळी ओळख निर्माण करावी," असेही कुलगुरूंनी मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी या कार्यशाळेतील सर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत मराठवाड्यातील १२ कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विषयतज्ज्ञांनी सहभाग घेतला. या केंद्रांनी मागील वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल तज्ज्ञांसमोर सादर केला. या अहवालांवर सखोल चर्चा झाली आणि विविध विभागांच्या कार्ययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, तसेच विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. प्रफुल्ल घंटे, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले, तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरीहिताच्या दृष्टीने ठोस आराखडा आखण्यात आला असून, कृषि विज्ञान केंद्रांद्वारे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.