Saturday, August 20, 2022

वेळीच करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

वनामकृवितील कृषि किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञ आणि लातुर कृषि विभागातील अधिकारी दिनांक १८ ऑगस्‍ट रोजी यांनी लातुर जिल्‍हयातील औसा आणि निलंगा तालुक्‍यातील येरंडी, सारोळा, करजगांव, चिंचोली, ननद आणि जाऊ यां गावांतील शेतकरी बांधवाच्‍या किड प्रादुर्भावाग्रस्‍त सोयाबीन प्रक्षेत्रांना भेटी दिल्‍या. या भागात गोगलगाई मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला असुन खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. ज्‍या शेतकरी बांधवांनी गोगलगाई नियंत्रणाकरिता कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाच्‍या शिफारसी प्रमाणे उपाययोजना अमलात आणल्‍या त्‍या शेतात मर्यादीत स्‍वरूपात प्रादुर्भाव दिसुन आला. मराठवाडया यावर्षी ब-याच ठिकाणी पावसाच्या उशीराच्या आगमनाने सोयाबीन पेरणीस उशीर झाला होता. तसेच जुलै महिन्यातील व ऑगस्‍टच्या पहिल्या आठवडयात होणारा सततचा रिमझीम पाऊस, आणि  ढगाळ वातावरणामुळे सोयाबिन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. खोडमाशीमुळे जवळपास सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागातील तज्ञांनी दिला आहे.  

कसा ओळखाल खोडमाशीचा प्रादुभार्व

खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची दाट शक्यता असते. अळी पान पोखरुन शिरेपर्यंत पोहचून शिरेतुन पानाच्या देठामध्ये शिरते व शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार, मागच्या बाजूने गोलाकार व पाय नसलेली अळी जमिनीच्या बाजूने डोके करुन म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लवकर लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. ब-याचदा झाड शेवटपर्यंत हिरवे राहते परंतु शेंगा भरत नाहीत. वेळीच उपाययोजना न केल्यास ५० टक्के पर्यंत उत्पादनात घट येउ शकते. 

कसे कराले खोडमाशीचे व्यवस्थापन 

सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे या आतील किडीसह नष्ट कराव्यात.प्रतिबंधात्‍मक उपाया म्‍हणुन ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली  १०  लिटर पाण्यातून फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी करावी किटकनाशकांची फवारणी 

शेतातील साधारणत: १० ते १५ टक्के झाडे खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त झाल्‍यास किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजुन पुढील रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावा. प्रति दहा लिटर पाण्‍यात २.५ मिली थायमिथोक्झाम १२. अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन . झेडसी किंवा ३ मिली क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८. एससी किंवा ३० मिली ईथीऑन ५० ईसी किंवा ७ मिली इंडोक्झाकार्ब १५.८० ईसी किंवा ६ मिली लॅमडा साहॅलोथ्रीन ४.९ सीएस यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकांची फवारणी करावी. वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणी साठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करतानाव फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा जेणे करुन विषबाधा होणार नाही. 

अशा प्रकारे खोडमाशीच्या व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. ए.जी. लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे आदींनी केले आहे.