Monday, August 22, 2022

वनामकृविचे सोयाबीन पैदासकर डॉ शिवाजी म्‍हेत्रे वसंतराव नाईक कृषी पुरस्‍काराने सन्‍माननीत

वसंतराव नाईक स्‍मृती प्रतिष्‍ठान पुसदच्‍या वतीने राज्‍यातील प्रयोगशील शेतकरी व कृषि शास्‍त्रज्ञांना देण्‍यात येणारे प्रतिष्‍ठीत वसंतराव नाईक कृषी पुरस्‍कार वितरण समारंभ माजी मुख्‍यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्‍या ४३ व्‍या स्‍मृतिदिन १८ ऑगस्‍ट पुसद येथे संपन्‍न झाला. या कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांना उत्‍कृष्‍ट कृषी शास्‍त्रज्ञ पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगे, मा. आमदार श्री इंद्रनील नाईक साहेब, माजी मंत्री मा.डॉ. एन पी हिराणी साहेब, हळद पीक विशेषज्ञ डॉ जितेंद्र कदम, हवामान विशेषज्ञ श्री पंजाबराव डख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभुषण मा. श्री. दीपकजी आसेगावकर, डॉ. उत्तमजी रुद्रवार, सौ. वृषालीताई नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सद्या डॉ म्‍हेत्रे अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी असुन त्‍यांचे कृषि संशोधन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्‍यांना हा पुरस्‍कारा करिता निवड करण्‍यात आली आहे. त्‍यांचा विविध खरीप ज्‍वारीरब्‍बी ज्‍वारीकरडई आणि सोयाबीन पिकांचे वाण विकसित करण्‍यात मोलाचा वाटा आहेयात एमएयुएस ६१२एमएयुएस ७२५एमएयुएस ७३१ आदी वाणाचा विशेष उल्‍लेख करावा लागेल. त्‍यांना यापुर्वी आदर्श शिक्षक पुरस्‍कार आणि राधाकिशन शांती मल्‍होत्रा पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले आहे. आजपर्यंत त्‍यांनी १५ पदव्‍युत्‍तर आणि ५ आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना संशोधक मार्गदर्शक म्‍हणुन कार्य केले आहे. त्‍याचे आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संशोधन नियतकालिकेत मध्‍ये ७० पेक्षा जास्‍त संशोधनात्‍मक लेख प्रसिध्‍द झाले आहेत. पुरस्‍काराबाबत डॉ म्‍हेत्रे यांचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि संशोधन  संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी अभिनंदन केले.