वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांचा सल्ला
काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल. कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी दोन ते तीन या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे. तसेच ५ टक्के निंबोळी अर्क अथवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची ८०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा एक अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास पुढीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.
एकरी प्रोफेनोफॉस
५० टक्के ४०० मिली प्रती किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम किंवा प्रोफेनोफोस
४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली या किटकनाशकांची
फवारणी आलटून पालटून करावी. सदरिल कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.
अश्या प्रकारे उपाय योजना केल्यास कपाशीतील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करून शकतो, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे, श्री.एम.बी.मांडगे आदींनी दिला आहे. अधिक माहितीकरिता कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्य दुरध्वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क करावा.
संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक- ०५/२०२२ (१८ ऑगस्ट २०२२)
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी