Monday, August 15, 2022

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात स्वराज्य महोत्सव साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिनांक १ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या कालावधी दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात अधिकारी-कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविले. शासनाच्या निर्देशानुसार ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनांक ११ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा रॕली’ आयोजित करण्यात आली. तिरंगा रॕली दरम्यान देशभक्तीपर दमदार घोषणा देवून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. तसेच या रॕलीद्वारे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी ध्वज उभारणी करावी तसेच इतर नागरिकांना ध्वज उभारणीसाठी प्रेरित करून या अभियानाबद्दल बद्दल जनजागृती  व  भारतीय ध्वज संहितेचे पालन करण्याबाबत दक्षता घेण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने महाविद्यालयात दिनांक १२ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रांगोळी, वक्तृत्व, देशभक्तीपर गीत, समूहगीत, एकल नृत्य, समूह नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला फाळणीच्या भीषण आठवणीच्या दिनानिमित्त प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनीचे औपचारिक उद्घाटन प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांनी केले. या वेळी मनोगतात भारताची  फाळणी हा देशासाठी अतिशय क्लेशदायी प्रसंग असल्याने त्यातून आपण धडे घेत देशवासियांप्रती सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक स्वाथ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणे नितांत गरजेचे असल्याचे विशद केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी व युवकांमध्ये जाज्वल्य देशभक्ती व लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेनुसार व संचालक शिक्षण डॉ. धर्मराज  गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमाची व कार्यक्रम नियोजनाची जबाबदारी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर तसेच डॉ. शंकर पुरी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. याप्रसंगी सेल्फी पॉईंट, महाविद्यालय तथा वर्षा वसतिगृहावर रोषणाई, देशभक्तीपर गिताच्या धुन आदींमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विभाग प्रमुख डॉ.नाहिद तस्नीम खान. डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.सुनिता काळे, डॉ.शंकर पुरी, प्रा.नीता गायकवाड,  डॉ.जयश्री रोडगे, डॉ.इरफाना सिद्धिकी  यांच्यासह  महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी   व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.आर.डी.चंदाले, श्री.रमेश शिंदे, माणिक गिरी , शाम गायकवाड,  गौस शेख, राम शिंदे आदींनी परिश्रम घेतले.