वनामकृवि अंतर्गत असलेल्या अंबाजोगाई विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राव्दारे गोगलगाय व्यवस्थापनावर जनजागृती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राव्दारे गोगलगाय व्यवस्थापनाबाबत अंबाजोगाई भागात विविध माध्यमातुन शेतकरी बांधवा मध्ये जनजागृती करण्यात आली. अंबाजोगाई तालुक्यातील मौजे जवळगाव जि. बीड येथील परिसरात सोयाबीन पिकात शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसुन आला आहे. गोगलगाय व्यवस्थापनाविषयी केंद्राव्दारे वेळोवेळी चर्चासत्राच्या माध्यमाने, व्हॉट्स अॅप, ऑनलाईन झूम, मायक्रोसोफ्ट टीम माध्यमाद्वारे, तसेच जिल्हा प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करण्यात आले आहे.
काही भागात सोयाबीन पिकात गोगलगायचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध परिसरात भेटी दरम्यान काही निरीक्षणे आढळून आली जसे कि, गोगलगाय जरी ५०० प्रकारच्या विविध वनस्पतीवर उपजीविका करत असली तरी खरिफ हंगामात ती मुख्यत्वे सोयाबीन पिकाकडे आकर्षिली जात आहे. विशेषत: पाणी धरून ठेवणारी, सतत ओलावा असनारी, ओढा, नाला, नदी काठाची जमिनीत प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. जमिनीची मशागत जसे कि नांगरणी ही हिवाळ्यात किंवा जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात होऊन मार्च ते मे उन्हात रान तळपून निघाल्यास तेथे गोगलगाय चा प्रादुर्भाव कमी दिसून आला आहे.
मौजे जवळगाव (ता. अंबाजोगाई जि. बीड) येथे दि. ८ जुलै रोजी प्रक्षेत्र भेटी सोबत शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकातील गोगलगाय व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन प्रशिक्षण आले. येळी विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी (अंबाजोगाई) श्री. सुर्यकांत वडखेलकर, कृषि निविष्ठा पुरवठाधारक श्री. हारे उपस्थित होते. यावेळी डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी सामुहिक प्रयत्नातून गोगलगाय व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
दिनांक १९ जुलै रोजी पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्या कृषि विभागातील कर्मचारी, अधिकारी व गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना शंखी गोगलगाय, पैसा आणि स्थितीजन्य खरिप पिकातील कीड व्यवस्थापना बाबत अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा किटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, जिल्हा समन्वयक कीटकशास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २८ जुलै रोजी डॉ. नरेशकुमार जायेवार आणि डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीवर ऑनलाईन माध्यमाद्वारे गोगलगाय नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. यात पुढील प्रमाणे विशेष सूचना दिल्या.
प्रादुर्भावग्रस्त भागात शंखी गोगलगायीचे शेतकरी बांधवानी सामुहिकरित्या व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असुन किमान आठ दिवस दररोज सकाळी ६ ते ९ दरम्यान गोगलगाई व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करण्याचा सल्ला दिला. तसेच १० टक्के गुळाच्या पाण्यात बारदाना भिजून किंवा ताणाच्या ढीगाऱ्याखाली गुळाचे पाणि टाकून, संध्याकाळी प्रादुर्भावग्रस्त शेतात किमान एकरी १० ते १२ ठिकाणी ठेवणे आणि सकाळी त्याची खाली गोळा झालेल्या गोगलगाई जमा करून नष्ट कराव्यात. एका शेतातुन दुसऱ्या शेतात गोगलगाई जाऊ नये म्हणून चुन्याची किंवा तंबाकुची ५ सेमी ची फक्की मरणे. रासायनिक नियंत्रणासाठी एकरी दोन किलो मेटाल्हाईड (स्नेलकिल) पसरून देणे या करिता मार्गदर्शन केले.
दिनांक १ ऑगस्ट रोजी अंबाजोगाई तालुक्यातील गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त भागातील कृषि विभागातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना विशेष मोहिमे अंतर्गत विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई येथे गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संजीवकुमार बंटेवाड, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
सौजन्य
विस्तार
कृषि विद्यावेत्ता