Friday, October 4, 2024

विद्या, धन आणि शक्ती यांचा उपयोग समाज कल्याणासाठी व्हावा - कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांचे कृषि पदवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालयाचा दीक्षारंभ समारंभ संपन्न


जगाचा आणि आपल्या देशाचा विचार करता, अंतराळ विज्ञान आणि कृषि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. जेव्हा ज्ञानाच्या माध्यमातून विद्या, धन आणि शक्ती प्राप्त होईल, तेव्हा त्यांचा उपयोग समाजकल्याणासाठी केला गेला पाहिजे. अशा विचारसरणीमुळेच मानवी जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे नव्याने सुरू झालेल्या कृषि महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आयोजित दीक्षारंभ समारंभात मार्गदर्शन करताना कुलगुरू महोदयांनी वरील विचार मांडले. कुलगुरू महोदय पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक शासकीय कृषि महाविद्यालय असावे अशी मनापासून इच्छा होती. हा जिल्हा आणि शहर राज्यातील महत्त्वाचे असून, शासन आणि विद्यापीठाच्या प्रयत्नांतून हे महाविद्यालय सुरू झाले, याचा अत्यंत आनंद आहे. याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसन्नता वाटते, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांची जिज्ञासू गुण विकसित झाली पाहिजे, तसेच त्यांच्या मनावर ताण येवू नये यासाठी प्रवेश घेतल्यानंतर दीक्षारंभ कार्यक्रमात सुरुवातीचे १५ दिवस विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदान कार्य पार पडले असे नमूद केले. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. पाटील, डॉ. बाळासाहेब अंधारे आदींची  उपस्थिती होती.

मागील पंधरा दिवसांत विविध विषयांचे प्राध्यापक आणि बाह्य तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला महाविद्यालयाशी जवळीक साधता आली, असे मनोगत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित दोन विद्यार्थ्यांनी कुलगुरू महोदयांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सुरेखा कदम यांनी केले.


Wednesday, October 2, 2024

वनामकृविच्या अन्नतंत्र महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम आणि विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा संपन्न

 ध्येयनिश्चिती करून उज्वल भविष्य घडवावे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी बी. टेक. अन्नतंत्र प्रथम वर्षात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम आणि विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके हे होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी उपस्थित पालकांचे त्यांच्या पाल्याने अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी पूर्वीच्या काळातील संस्कृत सुभाषिकामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी “काक चेष्टा बको ध्यानं, श्वान निद्रा तथैव च । अल्पहारी गृह त्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं॥“ या गुणांबद्दल मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक प्रणाली अभ्यासक्रमासाठी ही पहिली बॅच असून, याद्वारे अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य विकासाठी मोठी संधी मिळणार आहे. या महाविद्यालयांमध्ये केंद्रशासन पुरस्कृत सामायिक सुविधा केंद्रही आहे. यामुळे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत. विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चित करून, त्या दृष्टीने अभ्यास व कृती करावी आणि आपले उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले.
शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके म्हणाले की, यासाठी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे. अन्न तंत्र शाखेमधिल रोजगार व उद्योगासाठीच्या संधीबद्दल मार्गदर्शन करून औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व विशद केले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर बी क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे महत्व विशद केले. नवीन शैक्षणिक प्रणालीचा विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच म्म्हाविद्यालायाच्या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील हिरीरीने भाग घ्यावा असे सुचविले.
पालकांमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात श्रीमती खळीकर यांनी आणि विद्यार्थ्यांमधून कुमारी गायत्री शिंदे हिने महाविद्यालय आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतरचे अनुभव सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. के एस गाडे, डॉ. व्ही डी सुर्वे, डॉ. एस के सदावर्ते, डॉ. जी एम माचेवाड, डॉ. अनुप्रिता जोशी, डॉ. एस एम सोनकांबळे, डॉ.चंद्रलेखा भोकरे आणि शिक्षण सहयोगी डॉ. प्रीती ठाकूर, डॉ. गोविंद देसाई, डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. सय्यद जुबेर, डॉ. मोहम्मद निसार आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन साक्षी पाठक आणि आयुष जीभकाटे यांनी तर आभार साक्षी तिखे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी केले.





वनामकृवित स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आणि स्वच्छ भारत दिन साजरा

 सर्वांनी आपले मन स्वच्छ, विचार स्वच्छ आणि कार्य स्वच्छ ठेवावे.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आणि स्वच्छ भारत दिन” दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रमाद्वारे साजरा केला. यानिमित्त विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाद्वारे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या  महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे तर विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि शेतकरी भवन येथे तसेच इतर कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, स्वच्छ परिसर, स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ समाज असावा, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आग्रही होते. यावर्षी स्वच्छता मोहीमेसाठीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” थीमनुसार मनाची स्वच्छता, विचारांची स्वच्छता आणि कार्याची स्वच्छता हे सर्वात महत्त्वाचे आहे. याचे भविष्यात नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील. गांधीजी स्वतः सर्वात घाणीच्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करत आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देत. गांधीजींच्या विचारानुसार विचार स्वच्छ असतील तर कार्य स्वच्छ होते आणि यातून समाज चांगला बनतो. म्हणून स्वच्छतेचे कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसा पुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याबरोबरच गांधीजींचा अहिंसेचा विचार देखील महत्त्वाचा आहे. आपल्या मनात हिंसा येत असेल तर आपण एकही चांगले कार्य करू शकत नाही. म्हणून विचार अहिंसायुक्त स्वच्छ ठेवावे. आपल्या अधिकारासाठी अहिंसायुक्त कार्य करावे. आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण एखाद्या विरुद्ध हिंसा ने प्रतिकार करतो, यावेळी आपली ताकत अर्धी होते, परंतु अहिंसेने प्रतिकार करताना आपली दुप्पट ताकत येते. भारताद्वारे संपूर्ण जगाला अहिंसेचे पुजारी, शांतीचे दूत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शांततेचा संदेश दिला जात आहे. सर्वांनी आपले मन स्वच्छ, विचार स्वच्छ आणि कार्य स्वच्छ ठेवावे. दुसऱ्याविषयी मनात कटुता ठेवू नये. हा गांधीजींचा विचार, त्यांचे मानस मुलगा आणि मुलगी बनून पुढे घेवून जावू. गांधीजींचे विचार निरंतर पुढे चालू ठेवून समाजात शांतीद्वारे एकजुटीने कार्य करून समाज कल्याण साधू असे प्रतिपादन केले.

शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी प्लास्टिक मुळे स्वच्छतेच्या अनेक समस्या उद्भवतात. याकरिता प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावावी. आपला परिसर प्लास्टिक मुक्त ठेवावा. याबरोबरच महात्मा गांधीजी यांच्या स्वच्छतेचा आणि अहिंसेचा विचार मनात रुजवून स्वभावातच स्वच्छता ठेवावी असे नमूद केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर यांनी अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो तसेच पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे विषारी वायू निर्माण होतात. याचा जीवित तसेच वनस्पतीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवावा. याबरोबरच गांधीजींचे स्वच्छतेचे गुण अंगी करावेत असे प्रतिपादन केले

कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर बी क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी आर झंवर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले. कार्यक्रमा दरम्यान विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, निबंध स्पर्धा, व्हिडिओ क्लिप बनवणे, निबंध, भाषण अश्या विविध स्पर्धा मध्ये सहभागी होऊन विद्यापीठ परिसरात स्वच्छतेचे संदेश देवून स्वच्छतेचे कार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय पवार, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. रवी शिंदे, डॉ. प्रवीण घाडगे,  डॉ. विद्यानंद मनवर, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. वैशाली भगत आदींच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.







Tuesday, October 1, 2024

वनामकृविच्या नांदेड येथील कृषि महाविद्यालयाचा दीक्षारंभ समारंभ संपन्न

 शिस्तप्रिय आणि चारित्र्यवान होवून जीवनात उत्कर्ष साधावा...कुलगुरु मा.डॉ.इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात भरीव योगदान दिलेले असून सक्षम मनुष्यबळ विकास साधला आहे, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक ३० सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या नांदेड येथील कृषि महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये बी. एससी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महारष्ट्राच्या प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर या विद्यापीठातील विद्यार्थी यशस्वी सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय आणि चारित्र्यवान होवून जीवनात उत्कर्ष साधावा आणि आदर्श नागरिक बनावे. याद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबियांचा विकास साधावा असे नमूद केले.

कार्यक्रमासाठी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील वन विभागाचे, उप वन संरक्षक अधिकारी श्री केशव वाबळे (आयएफएस) हे होते. व्यासपीठावर कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री भागवत देवसरकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, माजी  संशोधन संचालक (बियाणे) डॉ. देवराव देवसरकर आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात आवलंबिले जात असून यामध्ये शिक्षण जास्तीतजास्त व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण करत असतांना आपल्या विविध कला-गुणांना वाव देवून आनंददायी करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन केले.

उप वन संरक्षक अधिकारी श्री केशव वाबळे यांनी, सध्या स्पर्धेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत कार्यमग्न ठेवणे आवश्यक आहे. अभासाक्रमाच्या पहिल्या सत्रापासूनच आपले ध्येय निश्चित करावे व यश मिळवावे असे नमूद केले.

प्रास्तविकात  सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि दीक्षारंभ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शैक्षणिक कार्यात तसेच क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. सुजाता धूतराज, डॉ. विजय चिंचाने, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, डॉ. नरेशकुमार जायेवार, उज्वला सुरेवाड, प्रकाश सिंगरवाड, संतोष राठोड, जी पी इढोले, वर्षा ताटेकुंडलवार, श्रीकृष्ण वारकड आदीसह नवीन  प्रवेशित सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.