माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस आणि माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण
विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय यशामागे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांचे प्रेरणादायी नेतृत्व
महाराष्ट्राचे
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी माननीय कृषिमंत्री ना. श्री.
दत्तात्रय भरणे यांच्या समवेत दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन
२०२६’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील
शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश व पुरस्कारांचे वितरण
केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणीच्या विद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन २०२६’ या राष्ट्रीय
स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक
मानाचा तुरा रोवला आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सुभाष
कुमार आणि वैष्णवी यांनी संशोधनाधिष्ठित अभिनव प्रकल्प सादर करून राष्ट्रीय
स्तरावर आपली वेगळी छाप पाडली.
विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन व
प्रेरणा देत असून,
विद्यापीठामध्ये उपलब्ध विविध सुविधा आणि संशोधनपर वातावरणाचा
विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांसह
विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करता येत आहे.
या विद्यार्थ्यांनी
राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) चे प्रमुख अन्वेषक तथा कृषी यंत्र व
शक्ती विभाग प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले.
या यशासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, तसेच माननीय कुलगुरू यांचे
तांत्रिक सल्लागार डॉ. प्रवीण कापसे, जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी
वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील
प्राध्यापक व संशोधकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेमध्ये
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘कृषी यांत्रिकीकरण
कृत्रिम बुद्धीमत्ता व रोबोटिक्स’ अंतर्गत ३डी उच्च-क्षमता फेनोटायपिंगसाठी
संसाधन-कार्यक्षम संकरित कृत्रिम बुद्धिमत्ता (Resource-Efficient Hybrid AI for 3D
High-Throughput Phenotyping) या विषयावरील अभिनव संशोधन प्रकल्प
सादर केला. या प्रकल्पामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि 3D
तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांच्या वाढीचे, आकारमानाचे
आणि उत्पादनक्षमतेचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी
विकसित केलेल्या या प्रणालीमुळे कच्च्या 3D डेटाच्या प्रक्रियेमध्ये
९८.८ टक्क्यांपर्यंत डेटा कमी होऊनही अचूकता कायम राखण्यात यश आले आहे. तसेच
“हायब्रिड व्ही-३ आर्किटेक्चर” आणि “स्टोकॅस्टिक रिफाइनमेंट” (Hybrid V3 Architecture
and Stochastic Refinement) यांसारख्या अभिनव संकल्पनांचा वापर करून
मॉडेलची कार्यक्षमता अधिक वाढविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात
कमी खर्चात अधिक अचूक व जलद विश्लेषण शक्य होणार असून, शेतकरी,
संशोधक आणि बीज उत्पादकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
या प्रकल्पामुळे
कृषी क्षेत्रात सुमारे ७५ टक्के खर्च बचत, ५० पट अधिक कार्यक्षमता आणि
जलद विश्लेषण क्षमता निर्माण होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भविष्यात
या तंत्रज्ञानाचा वापर विविध धान्य, कडधान्ये आणि तेलबिया
पिकांच्या 3D डेटाबेस निर्मितीसह रोग निदानासाठीही होऊ शकतो.

