Sunday, May 24, 2026

मौजे तरोडा येथे माती परीक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ मे रोजी माती परीक्षण उपक्रमाचे आयोजन मौजे तरोडा येथे करण्यात आले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दत्‍तक शेतकऱ्यांच्या शेतातून वैज्ञानिक पद्धतीने मातीचे नमुने संकलित केले. मातीचा नमुना घेताना शेतातील विविध ठिकाणांहून ठराविक खोलीपर्यंत माती घेण्याची पद्धत, नमुना स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच योग्य पद्धतीने नमुना परीक्षणासाठी पाठविल्यास अचूक अहवाल मिळण्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. संकलित नमुने पुढील परीक्षणासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, योग्य खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत तसेच पीक उत्पादन व गुणवत्तेत वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “माती परीक्षण ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, मृदा शास्त्र विषयतज्ञ डॉ. पिल्लेवाड तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख व डॉ. आशा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले तर उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना शेतकरी बांधवाकडुन अनेक गोष्‍टी प्रत्‍यक्ष शिकण्‍याची संधी या उपक्रमातुन होते. उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत मौजे तरोडा, सोन्‍ना आणि सुरपिंंपरी ही तीन गांवे दत्‍तक घेतली असुन येथे विविध कृषि कार्यक्रम, कृषि प्रात्‍यक्षिक राबविण्‍यात येणार आहेत.