Saturday, May 2, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाद्वारा महाराष्ट्र दिनानिमित्त जांब गावात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परभणी तालुक्यातील जांब (ता. परभणी) येथे बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागामार्फत, अभ्यासक्रमातील “पालक शिक्षण कार्यक्रमाचा बालविवाह प्रतिबंधावर होणारा परिणाम” या संशोधन विषयाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वीणा भालेराव, प्राध्यापक तथा विभागप्रमुख यांनी बालविवाह या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बालविवाहाची कारणे, त्याचे मुलींवर, कुटुंबावर तसेच भावी पिढ्यांवर होणारे दुष्परिणाम आणि हुंडा प्रथेचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर विद्यार्थिनींनी “बालविवाह थांबवा, मुलींचे भविष्य वाचवा” या विषयावर नाटिका सादर केली. या नाट्यप्रयोगाद्वारे ग्रामीण भागातील मुली व मातांसमोर बालविवाहाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थिनींनी ग्रामस्थांना बालविवाहाचे परिणाम, हुंडा प्रथा तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत टप्प्याटप्प्याने माहिती देत जनजागृती केली.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पालक व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन बालविवाह प्रतिबंधासाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील अंगणवाडी सेविका तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.