कृषि विज्ञान केंद्रांनी ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना प्रभावीपणे राबवावी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने परभणी येथे
दिनांक ५ ते ६ मे २०२६ दरम्यान मराठवाडा विभागातील १२ कृषि विज्ञान केंद्रांची
वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत १२ कृषि विज्ञान
केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ उपस्थित राहून सन २०२६ मध्ये
राबविण्यात येणाऱ्या विस्तार कार्याबाबत सादरीकरण केले.
कार्यशाळेच्या
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. एस. के. रॉय
तसेच एनएआयपीचे माजी राष्ट्रीय संचालक डॉ. ए. पी. श्रीवास्तव हे प्रमुख वक्ते
म्हणून उपस्थित होते. तसेच मथुरा येथील आयसीएआर-सीआयआरजीचे संचालक डॉ. आर. पी.
मिश्रा, शेरे कश्मीर
युनिव्हर्सिटीचे डॉ. गुलाम अहमद पॅरी, विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, मुख्य
विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ विस्तार कार्यात सक्रिय सहभाग घेत
नाही, तोपर्यंत तो पूर्ण अर्थाने चांगला शास्त्रज्ञ ठरत
नाही. याकरिता प्रत्येक शास्त्रज्ञाने विस्तार कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणे
आवश्यक आहे. प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने आपल्या जिल्ह्यात उपजीविका
सुरक्षिततेविषयी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपालमहोदय
यांच्या निर्देशानुसार प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने एक गाव दत्तक घेऊन त्या
गावातील शेतकरी बांधवांना कृषि विषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्याचा
प्रत्यक्ष वापर घडवून आणावा आणि त्या गावाला ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करावे,
असे त्यांनी सांगितले.
डॉ. एस. के.
रॉय यांनी सांगितले की, देशातील सर्व कृषि
विज्ञान केंद्रांमार्फत रासायनिक खतांच्या संतुलित वापरासंदर्भातील राष्ट्रीय
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी खरीप हंगामपूर्व “विकसित कृषि संकल्प
अभियान” हा कार्यक्रम संपूर्ण देशभर आयोजित करण्यात आला होता. या अभियानामार्फत
महाराष्ट्रातील सुमारे १० लाख आणि गुजरातमधील ५ लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषि विज्ञान
केंद्रांचे शास्त्रज्ञ पोहोचले होते. विविध विस्तार कार्यक्रमांच्या माध्यमातून
शेतकरी बांधवांना खरीप हंगामासंबंधी माहिती देण्यात आली तसेच कृषि क्षेत्रातील
नव्या तंत्रज्ञानाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमामुळे शेतकरी
बांधवांना उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली,
असे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन
सत्रात डॉ. ए. पी. श्रीवास्तव यांनी उपजीविका सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन
करताना सांगितले की, शेतकरी बांधवांचे
उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शाश्वत विकास साधण्यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब
करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि शेतीमध्ये
यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर करणेही गरजेचे आहे.
प्रास्ताविकात
डॉ. आर. डी. अहिरे यांनी सांगितले की,
शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य विस्तार पद्धतीचा
अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकरी, ग्रामीण युवक आणि विस्तार
कार्यकर्त्यांसाठी गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच
यावर्षी संभाव्य ‘अल निनो’ परिणाम, रासायनिक खतांचा संतुलित
वापर आणि उपजीविका सुरक्षितता या विषयांवर शेतकरी बांधवांमध्ये व्यापक प्रचार व
प्रसार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभास
परभणी मुख्यालयातील महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख,यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पटगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत देशमुख यांनी
केले.
.jpeg)


.jpeg)
.jpeg)
