Thursday, May 28, 2026

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘सीएचएआय सन्माननीय फेलो’ आणि ‘आजीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

 

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री. नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘सीएचएआय सन्माननीय फेलो पुरस्कार-२०२६’ (CHAI-Honoured Fellow Award-2026) तसेच ‘सीएचएआय आजीवन गौरव पुरस्कार-२०२६’ (CHAI-Lifetime Recognition Award-2026) या प्रतिष्ठेच्या दुहेरी राष्ट्रीय पुरस्कारांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना गौरविण्यात आले. हरियाणा राज्यातील महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठ (MPHU), करनाल येथे दिनांक २८ मे २०२६ रोजी आयोजित १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

कृषि शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि कृषी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेषतः कृषी शिक्षणातील गुणवत्ता वृद्धी, संशोधनाला चालना, शेतकरी हिताच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सीएचएआय (CHAI) संस्थेने हा सन्मान जाहीर केला.

‘सीएचएआय सन्माननीय फेलो पुरस्कार-२०२६’ (CHAI-Honoured Fellow Award-2026) हा पुरस्कार भारतीय कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील नेतृत्व व उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो, तर ‘सीएचएआय आजीवन गौरव पुरस्कार-२०२६’ (CHAI-Lifetime Recognition Award-2026) हा पुरस्कार संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि कृषी शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान केला जातो.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित करणे तसेच शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य प्रगत पद्धतीने केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांत अनेक अभिनव उपक्रम राबविले असून विद्यार्थ्यांसाठी उद्योगसहभागी शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना अमेरिका, दक्षिण आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, जपान आणि युरोपमधील विविध संस्थांमध्ये विद्यापीठीन व्याख्याते म्हणून कार्य करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून उच्चांकी ३.२१ गुणांसह ‘ए ग्रेड’ हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाले आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २५ जुलै २०२२ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI), नवी दिल्ली येथून कृषि अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर व आचार्य पदवी संपादन केली आहे. अल्पावधीतच त्यांनी शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी गती दिली आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘भारतरत्न सी. सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ए.एस.ए.बी.ई. (ASABE) चा ‘प्रेसिडेन्शियल सायटेशन पुरस्कार’, जलसंपदा मंत्रालयाचा ‘भूजल संवर्धन पुरस्कार’, भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI) चा ‘सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार’, तसेच आय.ए.ए.बी.ई. (IAABE) व आय.एस.ए.ई. (ISAE) फेलोशिप, ‘भारतीय अभियंता संस्था’चा ‘विख्यात अभियंता पुरस्कार – २०२४’ आणि ‘वर्षातील कुलगुरू – उत्कृष्ट नेतृत्वासाठी पुरस्कार – २०२५’ यांचा समावेश आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तारकार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवोन्मेष केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन या दृष्टीकोनातून कार्यरत आहे. त्यांच्या कार्यामुळे केवळ मराठवाड्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राचा गौरव वाढला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर व्यापक दखल घेण्यात आली आहे.

या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिवाराच्या सामूहिक कार्य, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव आहे. आधुनिक कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. ‘शेतकरी देवो भवः’ या मूल्याला केंद्रस्थानी ठेवून कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान, हवामान अनुरूप शेती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विद्यापीठ सातत्याने कार्यरत राहील. हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने आणि नव्या उमेदीने शेतकरी कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल.”

या यशाबद्दल विद्यापीठाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ देशातील अग्रगण्य कृषि विद्यापीठ म्हणून आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.