महाविद्यालयाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल : वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची ५० वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी अंतर्गत कार्यरत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयामध्ये “आंतरराष्ट्रीय
कुटुंब दिन २०२६” विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक,
कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच महाविद्यालयाच्या
सुवर्ण महोत्सवानिमित्त तसेच महाविद्यालयाने शैक्षणिक, संशोधन
व विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदानातून ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली
आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक,
कर्मचारी, विद्यार्थी यांच्याद्वारे आनंद आणि अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या पाच
दशकांपासून गृहविज्ञान व सामुदायिक विज्ञान क्षेत्रात महाविद्यालयाने ग्रामीण तसेच
शहरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या महाविद्यालयातून
शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत
असून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा ठसा उमटवत आहेत.
महाविद्यालयाच्या जडणघडणीत
१९७६ पासून अनेक सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान
दिले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा, संस्कृती व सामाजिक कार्यामध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महाविद्यालयाच्या
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १५ मे २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात विविध
मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या
सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी आपल्या संदेशात सांगितले की, सामुदायिक
विज्ञान महाविद्यालयाने विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधन व
समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या
काळातही ही संस्था अधिक उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. पुढे त्या म्हणाल्या की, शेतकरी महिला व
त्यांच्या कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून,
त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अखिल भारतीय समन्वयित
संशोधन प्रकल्प – कृषीरत महिला यांच्या माध्यमातून सातत्याने संशोधन कार्य करण्यात
येत आहे.
यावेळी विभाग प्रमुख
डॉ. शंकर पुरी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करताना सांगितले
की, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास,
नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य
केले आहे. ही संस्था समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली आहे.
वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाविद्यालयाने
संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या
सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची प्रेरणा
देणारे हे महाविद्यालय प्रेरणादायी केंद्र ठरले आहे.
महाविद्यालयाचे माजी
सहायक प्राध्यापक डॉ. विद्यानंद मनवर यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा
देताना सांगितले की,
५० वर्षांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे संस्थेच्या समर्पित शिक्षकवृंद,
कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या एकत्रित परिश्रमाचे फलित आहे.
यावेळी
महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांनीही
आपल्या भावना व्यक्त करत संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. सुवर्ण महोत्सवी
वर्षानिमित्त महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व
समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय
प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सेजल
गुंडेवार व श्रेया डागा यांनी केले.
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

