Monday, May 4, 2026

वनामकृवित ‘मोगरा फुलला’ने दरवळला संत परंपरेचा सुगंध; परभणीत सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ‘मोगरा फुलला’ हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्ताने संगीतमय व ज्ञानप्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाने संत परंपरा, साहित्य आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न साधला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी संत साहित्यामधील कृषिविषयक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. संतांनी आपल्या अभंग-रचनांमधून शेती, निसर्ग आणि कष्टाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले असून हे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले. संत साहित्य हे केवळ आध्यात्मिक नसून जीवनमार्गदर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास डॉ. भीमराव खाडे, श्री. विलास पानखडे, डॉ. रामेश्वर नाईक, ॲड. गोपाळ रोकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अन्ना जगताप, अधिव्याख्याता गणेश शिंदे, सुभाष ढगे, ज्ञानोबाराव नाईक, डॉ. मीनाक्षी पाटील, सौ. शीला चव्हाळ तसेच प्राचार्य डॉ. वामनराव जाधव यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम व शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब काळे, श्री. अरुण टाक, श्री. बबन आव्हाड, डॉ. निलेश दळवे, श्री. मधुकर नायक तसेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, चतुरंग प्रतिष्ठान आणि वेध परिवाराच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे प्रस्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन श्री. बाळू बुधवंत यांनी केले. कार्यक्रमात निरुपणकार श्री. गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सभागृहात मोठ्या संख्येने विद्यार्थी व श्रोते उपस्थित राहिल्याने कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषि विद्यापीठाच्या सभागृहात रंगलेल्या ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमाने संत परंपरेचा सुगंध आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली.