Monday, May 25, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंडो-जर्मन टूल रूममध्ये प्रतिष्ठित प्रशिक्षणाची संधी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या (CAET) कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, तेरा विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो-जर्मन टूल रूम (IGTR), छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिष्ठित ‘इन-प्लांट’ प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

या प्रशिक्षणामध्ये बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) च्या आठ विद्यार्थ्यांना चार महिन्यांचे (६०० तास) तर एम.टेक. (कृषि अभियांत्रिकी) च्या पाच विद्यार्थ्यांना एक महिन्यांचे (९६ तास) औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण २५ मे २०२६ पासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना कॅड, कॅम, (सीआरइओ / सीएटीआयए / युनिग्रफिक) (CAD/CAM (CREO/CATIA/Unigraphics), टूल डिझाईन, सीएनसी (CNC) प्रोग्रामिंग व मशिनिंग, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, पीएलसी, एससीएडीए (PLC, SCADA), थ्री-डी प्रिंटिंग तसेच लो-कॉस्ट ऑटोमेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होणार आहेत.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना एमएसएमई, सारथी व महाज्योती या केंद्र व राज्य शासनाच्या संस्थांकडून प्रायोजकत्व उपलब्ध झाले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्कासह इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे.

या यशामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांची प्रेरणा आणि कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गोपाळ यू. शिंदे तसेच आयजीटीआर, छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशिक्षण) श्री. जयेश बागुल यांचे विशेष मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रयत्न लाभले. विभागातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचेही मोलाचे योगदान राहिले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रभारी डॉ. मोरे, डॉ. डी. व्ही. पाटील, यूजी प्रभारी डॉ. देशवेना तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार सक्षम कृषि अभियंते घडविण्याच्या तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.