हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार स्वीकारला.
नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन
ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडिया (CHAI) या राष्ट्रीय स्तरावरील
संस्थेकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV), परभणी
यास ‘इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026’ (Institutional Fellow of
CHAI-2026) हा प्रतिष्ठेचा सन्मान हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार
श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी हरियाणा राज्यातील महाराणा प्रताप
उद्यानविद्या विद्यापीठ (MPHU), करनाल येथे दिनांक २८ मे
२०२६ रोजी आयोजित १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारला.
कृषि शिक्षण, संशोधन
आणि विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदान तसेच उद्यानविद्या क्षेत्राच्या
प्रगतीसाठी सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला
हा सन्मान बहाल करण्यात आला आहे असे CHAI चे संस्थापक व
अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंह यांनी नमूद केले.
यानिमित्त माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, हा पुरस्कार विद्यापीठाने
मराठवाड्यातील शेती विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे
भविष्यात नव्या उमेदीने विद्यापीठाच्या कार्यात भर पडून विद्यापीठाला राष्ट्रीय
पातळीवर नेण्यास चालना मिळेल. तसेच, याद्वारे विद्यार्थी आणि
शेतकऱ्यांचे कल्याण साधले जाईल.
सन १९७२ मध्ये
स्थापन झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने गेल्या पाच दशकांत कृषि
शिक्षण,
संशोधन व तंत्रज्ञान प्रसार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
विद्यापीठाने विविध पिकांच्या १६० हून अधिक वाणांची निर्मिती, ६० पेक्षा अधिक शेती अवजारे विकसित करणे तसेच ११०० हून अधिक कृषि
तंत्रज्ञान व शिफारसी विकसित केल्या आहेत. हवामान बदल, कोरडवाहू
शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत शेती यावर
विद्यापीठ विशेष भर देत आहे.
विद्यापीठाकडे १६ सलग्न
आणि ४० मान्यताप्राप्त महाविद्यालये असून याद्वारे प्रमाणपत्र, पदविका, पदवी,
पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान केली जाते. विद्यापीठाने याद्वारे तब्बल १.२७
लाख कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण केले आहे. १९ संशोधन केंद्रे, २३
अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP), तसेच विस्तृत
कृषी विज्ञान केंद्रांचे जाळे कार्यरत असून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान
पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे केले जात आहे. डिजिटल कृषि, कृत्रिम
बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृषि यांत्रिकीकरण
यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतही विद्यापीठ सक्रियपणे कार्यरत आहे.
या सन्मानामुळे
विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला
मोठी दखल मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)