Monday, May 25, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची वनामकृविच्या नांदेड येथील विकासकामांची पाहणी; गुणवत्तापूर्ण बांधकामावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र तसेच शासकीय कृषि महाविद्यालय परिसरातील सुरू असलेल्या नवीन बांधकाम कामांची दिनांक २५ मे २०२६ रोजी पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, विद्यापीठ उप अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शास्त्रज्ञ डॉ अरविंद पांडागळे आणि संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते तसेच प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी बांधकाम स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन इमारतींच्या गुणवत्तेबाबत, कामाच्या गतीबाबत तसेच नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. कापूस संशोधन केंद्र व शासकीय कृषि महाविद्यालय येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन शैक्षणिक व संशोधन सुविधांमुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी बांधकामातील सुरक्षितता, दर्जेदार साहित्याचा वापर आणि परिसर विकास यावर विशेष भर देत कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्यापीठाच्या विकासकामांमुळे कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याला अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पाहणी दौऱ्यादरम्यान बांधकामाच्या विविध टप्प्यांची माहिती संबंधित विभागाकडून माननीय कुलगुरूंना सादर करण्यात आली.