Friday, May 1, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा

राज्याच्या गौरवशाली परंपरेसोबत कृषि व शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन दिनांक  १ मे २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रीडा प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमानिमित्त बोलताना माननीय कुलगुरूंनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा अत्यंत समृद्ध असून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व विविध विकास प्रक्रियांमध्ये राज्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक वारसा मोठा असून राष्ट्रविकासात राज्याचे योगदान अनमोल आहे. संत, वीर, राष्ट्रपुरुष, देशभक्त, योद्धे व समाजसुधारकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत अनेक महान व्यक्तिमत्त्वे घडली. महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांच्या कार्याचा आज संपूर्ण देश आदर्श घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय प्रगती साधली असून कृषी क्षेत्रात राज्य देशाला दिशादर्शक ठरत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त केला असून राज्यपातळीवर अग्रगण्य स्थान मिळवले आहे. मागील तीन वर्षांत विद्यापीठाच्या दहा संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच विविध पुरस्कार व पदकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा अधिक उंचावली असून आर्थिक सहाय्य मिळण्यासही मदत होत आहे.

विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर अशा विविध क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून विद्यापीठ कार्यरत असून सध्याच्या अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

विद्यापीठ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे कार्य करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातील नकारात्मकतेचा प्रभाव स्वतःवर पडू न देता सकारात्मकतेने पुढे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनुष्यबळ कमी असतानाही विद्यापीठसातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन यावर भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले.