Saturday, August 11, 2018

क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत विविध गावांत मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेल्‍या पिकांवरील कीड - रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून परभणी जिल्हयात काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आला आहे. त्या अनुषंगाने गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी दिनांक ८ ऑगस्ट रोजी किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालूका कृषि अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी के. एम. जाधव यांनी परभणी जिल्‍हयातील विविध गावांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. यात पिंपळगाव (ठोंबरे), उमरी, बाभळगाव, झरी, मिर्झापूर, आर्वी व साडेगाव येथील गुलाबी बोंडअळीग्रस्त क्षेत्रांना भेटी देऊन उपाय योजना सुचविल्या.
मौजे साडेगाव येथे आयोजीत शेतकरी मेळयाव्यात बोलतांना डॉ. अनंत बडगुजर यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब केल्‍यास कमी खर्चात योग्य वेळी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करता येते असे सांगितले. शेतकरी बांधवांनी खालील प्रमाणे उपाययोजना तातडीने कराव्यात असे आवाहन केले.
·        सुरुवातीस कीडीच्या संनियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे व मोठया प्रमाणात पतंग एकत्रित गोळा करण्यासाठी हेक्टरी वीस कामगंध सापळे लावावेत जेणे करुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात आकर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.
·        उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा ट्रॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधील माशीचा वापर करावा. (1.5 लाख अंडी / हेक्टर)
·        पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
·        कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.
·        निंबोळी अर्काची फवारणी करावी.
·        आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी/10 बोंडे/फुले किंवा 8 पतंग/सापळा सलग 3 रात्री दिसून आल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर झाला आहे हे ग्रहीत धरुन योग्‍य त्‍या किटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात. 

Thursday, August 9, 2018

मराठवाडातील गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी सरसावले वनामकृवितील कृषीचे विद्यार्थी

आजपर्यंत मराठवाडयातील 198 गावात शेतक-यांच्‍या बांधावर मार्गदर्शन, पुढील काही दिवसात एकुण पाचशेपेक्षा जास्‍त गावात पोहचण्‍याचा कृषीदुतांचा निर्धार
मागील वर्षी निर्माण झालेला कापसावरील गुलाबी बोंडअळीचा धोका यावर्षी उदभवु नये, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाचा कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्‍या वतीने विविध विस्‍तार कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना कापसावरील गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनाकरीता मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. या विस्‍तार कार्यक्रमात मराठवाडा विभागातील विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यीही सरसावले आहेत. कृषि पदवीच्‍या संपुर्ण सातवे सत्र हे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) म्‍हणुन राबविण्‍यात येतो, या कार्यक्रमात कृषीचे विद्यार्थ्‍यी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतात जाऊन कृषी तंत्रज्ञानाचे धडे घेतात. यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन व शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली रावे अंतर्गत कापसावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन विशेष मोहिम राबविण्‍यात येत असुन जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचविण्‍याचा विद्यापीठाचा उदेश्‍य आहे. मराठवाडयात एकुण 27 घटक व संलग्‍न कृषि महाविद्यालय असुन 2280 विद्यार्थ्‍यी यावर्षी या सत्रात असुन ते मराठवाडयातील 198 गावांमध्‍ये कार्यरत आहेत. 
आजपर्यंत सदरिल 198 गावात हे कृषिदुत व कृषिकन्‍या शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले असुन पुढील काही दिवसांत पाचशे पेक्षा जास्‍त गावात ही मोहिम राबविण्‍याचे लक्ष आहे. गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत विद्यार्थ्‍यांना विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ञ तसेच संबंधित कृषि महाविद्यालयातील किटकशास्‍त्राचे प्राध्‍यापक वेळोवेळी मार्गदर्शन करित आहेत. काही शेतक-यांच्‍या शेतावर किडींची नुकसानीची आर्थिक पातळी तपासण्‍यासाठी कामगंध सापळेही विद्यार्थ्‍यांनी लावले असुन कामगंध सापळे, मित्रकिडींचे महत्‍वही शेतक-यांना सांगण्‍यात येत आहे. तसेच किडकनाशक फवारणीचे वेळापत्रक यांचे ही वाटप शेतक-यांना करण्‍यात येत असुन प्रात्‍यक्षिकाव्‍दारे किडकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयीही मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. हा संपुर्ण उपक्रम जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व संबंधीत गावांतील कृषी सहाय्यक यांच्‍या सहकार्याने राबविण्‍यात येते आहे. उपक्रमासाठी विद्यापीठ रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर आदीसह संबंधित कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्‍यापक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ परिश्रम घेत आहेत.



Wednesday, August 8, 2018

परभणी तालुक्यातील बाभुळगाव व उजळंबा येथे हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने दि. 6 ऑगस्‍ट रोजी हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत कोरडवाहु पिकांचे व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम बाभुळगाव व उजळंबा येथील शेतक-यांच्‍या शेतावर घेण्यात आले. कार्यक्रमात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व डॉ. मदन पेंडके यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सद्यपरीस्थितीत पावसाचा पंधरा दिवसाचा खंड पडला असुन सोयाबीन पिकांवर पोटॅशियम नायट्रेट 2 टक्के फवारणी करावी, असा सल्‍ला मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार यांनी दिला तसेच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर शेततळ्यातील पाण्याद्वारे पिकांना संरक्षीत सिंचन देण्यासंबंधीची माहिती डॉ. मदन पेंडके यांनी दिली. यावेळी निवडक शेतक­यांना पोटॅशियम नायट्रेट व कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले व त्याबद्दलचे प्रात्यक्षिक शेतक-यांना देण्यात आले. सदरिल उपक्रम मागील सात वर्षापासुन परभणी तालुक्यातील बाभुळगाव व उजळंबा या गावातील शेतक-यांच्‍या शेतावर राबविण्यात येत आहे. बाभुळगाव येथील सरपंच श्री गणेश दळवे, श्री माऊली पारधे, उजळंबा येथील सरपंच श्री मोगले आदीसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, August 7, 2018

हिंगोली व परभणी जिल्‍हयात वनामकृविच्‍या “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी” उपक्रमास मोठा प्रतिसाद

उपक्रमांर्गत आजपर्यंत 30 गावात राबविण्‍यात आली गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन विशेष मोहीम
मराठवाडा विभागात झालेल्या सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे, परंतू मागील 15-20 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पिक संरक्षण याकरिता शेतक­यांच्या शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्यात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विशेष विस्तार उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी :  तंत्रज्ञान शेतावरी” राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी यांच्या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक­यापर्यंत पोहचविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्यात आला आहे.
सदरील कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार गावाची निवड करण्यात आली असून आजपर्यंत विविध तालुक्यातील 30 गावामध्ये विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतावर भेट देऊन व चर्चासत्राच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन करण्यात आले. परभणी व हिंगोली जिल्हयासाठी शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले आहेत. या चमुचे प्रमुख डॉ. यु. एन. आळसे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. बी. लटपटे आदी असुन या चमुत कृषिविद्या, किटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ञांचा समावेश आहे. यात छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्थानी जलसंधारण आदी विषयांवर शेतक-यांना शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. विशेष करुन आजच्या अवर्षण परिस्थितीमध्ये पिक व्यवस्थापन, पिक संरक्षणामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन या विषयांवर शेतक­यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागणी अधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. सदरिल कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले आहे.

पावसाच्या खंडकाळात कोरडवाहू पिकाचे व्यवस्थापन

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट फवारणीचा वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

मराठवाडयात या वर्षी पावसाळा अगदी वेळेवर सुरु झाला, जुन व जुलै महिन्यात काही तुरळक तालुके वगळता साधारणपणे सर्वत्र चांगला पाऊस झाला तसेच पेरण्याही वेळेवर झाल्या. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या पुढेही आठवडाभर तुरळक पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे. दरवर्षी पावसाची परिस्थिती वेगवेगळी असते, पावसाचे वितरण वेगवेगळे असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये मागील 50 वर्षाच्या पावसाच्या आकडेवारीचे पृथ्थकरण केले असता असे आढळून आले की, जुलै व ऑगस्ट महिन्या मध्ये हमखास पावसाचा खंड पडतो,  या पावसाच्या खंड काळात कोरडवाहू पिके वाचविणे हे फार मोठे आव्हान असते. सन 2015 मध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात 45 - 50 दिवसाचा पावसामध्ये खंड पडला होता, त्यामुळे कोरडवाहू पिके वाळून गेली होती. अशा पावसाच्या खंड काळात कोरडवाहु पिकांचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे केल्यास पिकावर पडणारा पाण्याचा ताण काही अंशी कमी होऊन पिक उत्पादनात होणारी घट निश्चितच कमी होऊ शकते, असे सल्‍ला अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे शास्‍त्रज्ञ डॉ.भगवान आसेवार व  डॉ. मदन पेंडके यांनी दिला आहे.
बीटी कापूस : कापसाचे पिक सध्या फुलोरा, पाते लागणे या अवस्थेत आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार कोळपणी / वखरणी करावी जेणेकरुन जमिनीवर पडलेल्या भेगा बुजून खालच्या थरातील ओलावा टिकून राहील. जमिनीत जास्त ओलावा नसल्यामुळे पिक मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषणकरु शकत नाही. तसेच पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणीकरणे आवश्‍यक आहे. यासाठी 200 ग्रॅम पोटॅशियमनायट्रेट 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पिकावर ब­याच ठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा दिसत आहे. शेंदरी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त फुले, पाते गोळा करुन नष्ट करावीत. कामगंध सापळ्याचा वापर करावा. लिंबोळी अर्क 5 टक्के प्रमाणे सलग 8 दिवसाच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात. पिकामध्ये दोन ओळी / तासा नंतर एक जलसंधारण सरी पाडावी जेणेकरुन पाऊस झाल्यावर सरीमध्ये पाणी जास्त साचुन ओलावा जास्त काळ टिकून राहतो तसेच जास्त पाऊस झाला तर या सरी वाटे जास्तीचे पाणी शेताबाहेर निघून जाते.
निंबोळी अर्काची फवारणी घेवूनही शेंदरी बोंडअळी नियंत्रणात नाही आल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
सोयाबीन : सोयाबीनचे पीक सध्या फुलोरा या अवस्थेत आहे. पाने खाणारी अळी व खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी प्रोफेनोफॉस याकिटकनाशकाची 50 टक्के प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाण्याचा ताण कमी करण्यासाठी तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) 200 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीन पिकात पेरणीनंतर 35 दिवसाने प्रत्येक चार ओळी / तासा नंतर एक जलसंधारण सरी बळीराम नांगराच्या सहाय्याने पाडावी. यामुळे पुढे पाऊस पडल्यास जास्तीचे पाणी जमिनीत मुरते व ओलावा जास्त काळ टिकून राहतो. पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी तुषार सिंचनाने द्यावे.
मुग : मुगाचे पिक सध्या फुलोराते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. पिकावरील माव्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भूरी रोग आढळून आल्यास गंधकाची 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्यास तुषार सिंचन पध्दतीने पिकास संरक्षित पाणी द्यावे.
मका : मका हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. खोडकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी कार्बोफ्युरान 3 टक्के 13 किलो प्रती एकर जमिनीतुन द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास तुषार सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे.
तुर : तुर पिक हे वाढीच्या अवस्थेत आहे, पिकाची आंतरमशागत करुन पिक तण विरहीत ठेवावे. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील. आंतरमशागतीची कामे झाल्या नंतर दोन ओळी नंतर एक बळीराम नांगराच्या सहाय्याने एक जलसंधारण सरी काढावी.
ज्या ठिकाणी खरीप पिकाचे क्षेत्र कमी आहे. अशा ठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो वाळलेले गवत, सोयाबीन पिकाचा भुसा,  ऊसाचे पाचट, पालापाचोळा, गिरीषुष याचा पाला 3 ते 5 टन प्रती हेक्टरी वापरावा.
धुळ आच्छादन: जमिनीच्या पृष्ठभागावरचा पातळथर हा 8 ते 10 दिवसाच्या अंतराने कोळपणी द्वारा भुसभुसीत करुन घ्यावा. मातीचे जमिनीवर आच्छादन तयार होते. जमिनीमध्ये पडणा­या भेगा बुजून कमी होऊन बाष्पीभवनास अवरोध निर्माण होतो व ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
संरक्षित सिंचन : पावसावर पुर्णत: अवलंबून असलेल्या कोरडवाहु शेतीमध्ये पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे पावसा अभावी जमिनीतील ओलावा कमी होत असून बरोबरच तापमान वाढीमुळे पिकांची पाण्याची गरज वाढत आहे. जुन महिन्यात ब­यापैकी पाऊस झाल्यामुळे बहुतांश भागातील शेततळी पाण्यानी भरलेली आहेत. त्यातील पाण्याचा वापर पिकांना संरक्षीत सिंचन देण्यासाठी करावा. संरक्षित सिंचनासाठी शक्यतोवर तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. वा­याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी संरक्षित पाणी द्यावे.

सौजन्‍य
डॉ.भगवान आसेवार व  डॉ. मदन पेंडके
अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी