Thursday, April 30, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांना निरोप

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण विकास साधावा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक ३० एप्रिल २०२६  रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. डी. विखे, २०२२ बॅचचे समुपदेशक डॉ. एम. आर. मोरे व डॉ. व्ही. के. इंगळे उपस्थित होते.

या समारंभात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, चार वर्षे कृषि अभियांत्रिकीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आता हे विद्यार्थी शेती क्षेत्रात नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ड्रोन, ठिबक सिंचन, स्मार्ट शेती अशा तंत्रज्ञानाची जोड घेऊन हे कृषि अभियंते ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होऊन इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके म्हणाले की, चार वर्षांत महाविद्यालयात संपादन केलेल्या ज्ञान व कौशल्याचा वापर पदवीधरांनी शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी करावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. तसेच त्यांनी माजी शिक्षण संचालक व अधिष्ठाता (कृषि) डॉ. उदय खोडके, माजी विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके व प्रभारी शिक्षण प्रा. विवेकानंद भोसले यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन केले.

विद्यार्थ्यांच्या वतीने ऋषीतिलक सातोनकर, समर्थ असुतकर, अंशिका राऊत, साक्षी क्षीरसागर व रोहित कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरुवातीला प्रथम वर्षांच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मोहिनी चापके, श्रद्धा देशमुख व मुदिता इंगळे यांनी केले. डॉ. एस. डी. विखे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिकेत वाइकर व डॉ. गजानन वसू यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. रविंद्र शिंदे तसेच प्राध्यापक डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रेय पाटील, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. शैलजा देशवेना, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.