Tuesday, August 11, 2026

उसावरील पायरीला (पाकोळी) किडीचा वाढता प्रादुर्भाव : वेळीच करा एकात्मिक व्यवस्थापन

 वनामकृविच्या तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन

सध्याच्या पावसाळी हंगामात ढगाळ वातावरण, वारंवार होणारा रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता यामुळे काही भागातील उसामध्ये पायरीला (पाकोळी) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. या किडीची पिल्ले व प्रौढ उसाच्या पानातील रस शोषून घेत असल्याने पानांची हिरवेपणा कमी होऊन पाने पिवळसर व निस्तेज होतात. त्याचबरोबर किडीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट गोड पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पानांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. पायरीला किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत, तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच योग्य एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. गजानन गडदे आणि श्री. मधुकर मांडगे या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.

किडीची ओळख आणि जीवनक्रम –

या किडीची मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये आणि आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला शिरेजवळ ४-५ ओळीत पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते, एका पुंजक्यामध्ये ३० ते ४० अंडी असतात. अंड्यावर मेणचट दोऱ्यासारखे आवरण असते. अंडी अवस्था तापमान व ऋतुमानानुसार बदलते. उष्ण हंगामात अंडी अवस्था साधारणतः ७ ते १२ दिवसांची, तर थंड व प्रतिकूल परिस्थितीत २० ते ४१ दिवसांपर्यंत असू शकते. हिवाळ्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीत थंडीपासून अंड्याचे संरक्षण व्हावे यासाठी पानाच्या आतल्या आवरणामध्ये अंडी घातली जातात. अशा अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात ज्यांच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात आणि शरीरावर मेणचट आवरण असते. पिल्लावस्थेचा कालावधी देखील तापमान व ऋतुमानानुसार मोठ्या प्रमाणात बदलतो. तर प्रौढ फिकट पिवळसर रंगाची व पाचरीच्या आकाराची असतात. पायरीला किडींचे प्रौढ वातावरणानुसार १४ ते २०० दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात तसेच नरापेक्षा मादी काही काळ जास्त जिवंत राहते. अशाप्रकारे कीड एका वर्षात ३ ते ४ पिढ्या पूर्ण करते.

हवामानाचा प्रभाव

ही कीड वर्षभर सक्रिय असते; परंतु पायरीला किडीच्या वाढीसाठी उबदार व दमट वातावरण पोषक ठरते. पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, वारंवार होणारा रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता यामुळे या किडीची संख्या वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने या काळात उसाचे नियमित निरीक्षण करावे. अतिउष्ण व कोरड्या वातावरणात किडीची संख्या कमी होते.

नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे

या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही उसाच्या पानातील रस शोषण करतात,परंतु पिल्लं जास्त प्रमाणात नुकसान करतात. पानातील रस शोषण केल्याने उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात, तसेच हि किड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ तिच्या शरीरातून बाहेर सोडते त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखा रंग चढून पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते. अशा उसापासून तयार केलेली साखर आणि गूळ कमी दर्जाचा मिळतो. वाढीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास उसाच्या उत्पादनात घट होते तर पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्यास साखर उताऱ्यात घट होते.

पर्यायी खाद्य वनस्पती

 गहू, मका, ज्वारी, बाजरी, ओट, बार्ली, इतर तृणधान्ये आणि गवतवर्गिय तणे

निरीक्षण व आर्थिक नुकसानीची पातळी

पिकाचे नियमितपणे किमान आठवड्यातून एकदा निरीक्षण करावे. शेतातील विविध भागांतून उसाची बेटे/कांडे निवडून त्यावरील पानांवर पायरीला किडीची पिल्ले, प्रौढ व अंडीपुंज यांची नोंद घ्यावी. सरासरी ३ ते ५ पिल्ले किंवा प्रौढ प्रति पान अथवा १ अंडीपुंज प्रति पान आढळल्यास व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुरू कराव्यात. निरीक्षण करताना शेताच्या बांधालगतचा भाग तसेच पिकाच्या आतील भागातील झाडे यांचा समावेश करावा.

एकात्मिक व्यवस्थापन

पिकाची फेरपालट करावी.

ज्याठिकाणी पायरीला किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला असेल त्या ठिकाणी खोडवा ऊस घेण्याचे टाळावे कारण खोडवा पीक किडीसाठी सतत उपलब्ध खाद्य वनस्पती म्हणून काम करू शकते आणि पायरीला किडीची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते.

उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल.

लागवड करताना बेण्यास क्लोरोपारीफॉस २०% या कीटकनाशकाची ०२ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात बेणे प्रक्रिया करून मगच लागवड करावी.

आंतरपीक म्हणून बटाटे,कांदा, टरबूज, काकडी, सोयाबीन, चवळी, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करावी.

पीक तन विरहित ठेवावे आणि पर्याय खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात.

उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.

नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. नत्राचा अतिरेक टाळून माती परीक्षण व पिकाच्या गरजेनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. जास्त नत्रामुळे कोवळी व रसाळ वाढ वाढू शकते आणि रसशोषक किडींच्या वाढीस अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

खोडवा उसामध्ये खालची दोन पाने काढून टाकावी कारण किडीद्वारे अंडी देण्यासाठी या पानांना प्राधान्य दिले जाते.

जुनी वाळलेली पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत जेणेकरून पुढे होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल.

पानावर अंडी पुंज आढळून आल्यास अशी पाने अंडी पुंजासह जमा करून नष्ट करावीत.

निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू ठेवावा.

वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीचा वापर ४० ग्रॅम/१० लिटर पाणी या प्रमाणात करावा.  तसेच या जैविक बुरशीच्या उत्पादनाची गुणवत्ता, जिवंत बीजाणूंची संख्या आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार ही मात्रा बदलू शकते. त्यामुळे उपलब्ध नोंदणीकृत उत्पादनाचा वापर त्यावरील शिफारशीनुसार करावा.

इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे व इतर मित्र कीटकांचे संवर्धन करावे जेणेकरून नैसर्गिकरित्या किडींचे व्यवस्थापन होईल त्याकरीता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. पायरीला किडीच्या शेतामध्ये इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका चे पांढरे कोष, ढालकिडे, भक्षक भुंगेरे, क्रायसोपा व इतर नैसर्गिक शत्रू मोठ्या प्रमाणात आढळत असल्यास त्यांचे संरक्षण करावे आणि अनावश्यक रासायनिक फवारणी टाळावी.

उपलब्ध झाल्यास इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे ४००० ते ५००० कोष अथवा ४ ते ५ लाख अंडी शेतामध्ये सोडावीत. पायरीला किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचल्यास उपलब्धतेनुसार ही जैविक नियंत्रणाची उपाययोजना करावी. इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका हा पायरीला किडीच्या पिल्ले व प्रौढांवर बाह्यपरजीवी म्हणून कार्य करतो.

ज्या उसामध्ये मित्र कीटकांची संख्या जास्त दिसून येत असेल त्या शेतातील पाचट जाळू नये.

रासायनिक व्यवस्थापनाकरिता क्लोरोपायरीफॉस २० टक्के ६०० मिली प्रति एकर फवारावे. जैविक, यांत्रिक व इतर एकात्मिक उपाययोजनांनंतरही पायरीला किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त राहिल्यासच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. फवारणीपूर्वी संबंधित उत्पादनाच्या अद्ययावत लेबलवरील पीक, किडीची शिफारस, मात्रा, पाणी प्रमाण व प्रतीक्षा कालावधी तपासूनच वापर करावा.

            आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी मात्र मित्रकीटकांची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी. रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा किडीची संख्या, आर्थिक नुकसानीची पातळी आणि शेतातील मित्रकीटकांची स्थिती विचारात घेऊनच करावा.

फवारणी करताना घ्यावयाची अत्यंत महत्त्वाची काळजी

वरील कीटकनाशकांसोबत इतर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळू नयेत

एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी करू नये.

फवारणीसाठी स्वच्छ पाणी व शिफारशीनुसार पाण्याचे प्रमाण वापरावे

कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

फवारणी करताना मास्क, हातमोजे इ. संरक्षक साधनांचा वापर करावा.

        अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा. (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून)

वनामकृवि संदेश क्रमांक –०३/२०२६ (११ ऑगस्ट २०२६)