एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे संतुलित पीक पोषणाची गुरुकिल्ली : डॉ. हरिहर कौसडीकर यांचे कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी येथे जमीन आरोग्य पत्रिका वाटप व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मोसंबी व चिकू बागायतदारांसह हरभरा, हळद आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता.
या प्रशिक्षण
कार्यक्रमात मृद विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी
शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी जैविक खते
व इतर कृषि निविष्ठांचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जमिनीचे
आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि संतुलित पीक पोषण साध्य करण्यासाठी एकात्मिक
अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व विविध उदाहरणांसह विशद केले. एकात्मिक
अन्नद्रव्य व्यवस्थापन हे जमिनीचे आरोग्य सुधारण्याबरोबरच पीक उत्पादकता
वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोसंबी व
संत्रा बागायतदारांना भेडसावणाऱ्या जमिनीचे आरोग्य आणि पीक पोषणविषयक विविध
समस्यांवरही त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
तसेच हवामान
बदल आणि नैसर्गिक संसाधनांची मर्यादित उपलब्धता यांमुळे पीक उत्पादकतेवर प्रतिकूल
परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचा संतुलित व
शिफारशीनुसार वापर, नियमित माती परीक्षण,
जैविक खतांचा वापर आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन याबाबत
शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे डॉ. कौसडीकर यांनी
प्रतिपादन केले.
प्रशिक्षणादरम्यान
निंबोळी पेंड, करंज पेंड, शेणखत, गांडूळ खत आदी सेंद्रिय खतांचे महत्त्व व
त्यांचा वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यापीठाद्वारे उत्पादित
जैविक खतांचा वापर कोणत्या पद्धतीने व किती प्रमाणात करावा, याबाबत
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. यावेळी
विद्यापीठामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सेवा व कृषि निविष्ठांची माहिती देऊन
शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाच्या संपर्कात राहून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन डॉ. कौसडीकर यांनी केले.
मृद विज्ञान
विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना राष्ट्रीय कृषि विकास योजनेची माहिती दिली. तसेच
जमीन आरोग्य पत्रिकेचा अभ्यास करून त्यानुसार पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचे
व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन
केले. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर होणारे परिणाम
आणि त्याचा पीक उत्पादकतेवर होणारा परिणाम याविषयीही त्यांनी माहिती दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. पांडुरंग राजाभाऊ
काळे, श्री. योगेश नामदेवराव काळे, श्री. ज्ञानोबा भाऊराव काळे, श्री. उत्तमराव
मारोतराव काळे, श्री. संतोष भगवान रेंगे, श्री. उद्धव पंडितराव काळे, श्री. संभाजी पांडुरंग
काळे, श्री. दिलीप पुरभाजी काळे, श्री.
बाळा प्रसाद बाबाराव काळे, श्री. खुशाल पांडुरंग काळे,
श्री. तुकाराम भाऊराव काळे, श्री. किशन
राजाभाऊ काळे, श्री. प्रताप किशनराव काळे, श्री. प्रवीण किशनराव काळे आणि श्री. बाळासाहेब संभाजी काळे यांच्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील
विविध पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनासंदर्भातील समस्यांवर तज्ज्ञांकडून
मार्गदर्शन घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.


.jpeg)

.jpeg)
.jpeg)