Saturday, July 20, 2024

वनामकृविच्या ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

 शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ल्यांची नितांत गरज.... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय  व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रॉपसॅप प्रकल्प कीटकशास्त्र विभाग अंतर्गत ऑनलाईन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा तिसरा भाग मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ जुलै  रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० दरम्यान संपन्न झाला. यावेळी  लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, छत्रपती संभाजीनगर विभागाचे डॉ. तुकाराम मोटे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी ऑनलाईन कृषि संवादास तीनशे पंधरा अशा बहुसंख्येने शेतकरी, शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ल्यांची नितांत गरज आहे, त्यांना प्रत्येक आठवड्यातील हवामान बदल आणि वेळेनुसार पिकांची किडी, रोग, तण यापासून संरक्षणासाठी आणि आंतरमशागत, खत, सिंचन, व्यवस्थापनासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात यातूनच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यास नक्कीच मदत होईल असे नमूद केले. तसेच शेतकऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये निसंकोचपणे शेतीविषयक प्रश्न विचारावेत. या प्रश्नांचा आदर करून विद्यापीठातील शास्त्रज्ञ समर्पक निरसन करतील असे नमूद केले तसेच ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने माफक दरामध्ये  सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले. तदनंतर डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा सल्ला दिला. त्यांनी येणाऱ्या आठवड्यामध्ये पर्जन्यमान चांगले असल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा ठेवावा तसेच फवारणी सुद्धा पावसाच्या अंदाजानुसार पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. याबरोबरच पावसाचा अंदाज अचूक घेण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये दामिनी व मेघदूत या ॲपचे डाऊनलोड करून घेण्यास प्रोत्साहित केले.

यानंतर कापूस पीक तज्ञ डॉ अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकातील तण आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले व तणामुळे पिकात होणारी विकृती तसेच उगवणी पूर्व आणि पश्चात तणनियंत्रक औषधाची माहिती दिली   तसेच कापूस पिकातील रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल कीटक शास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कपाशीवरील मुख्य आणि दुय्यम किडीची ओळख, त्यांच्यामुळे होणारे नुकसान व त्यांच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत तुडतुडे आणि फुलकिड्यांची नियंत्रण करण्याची गरज आहे असे नमूद करून मागील वर्षापासून टोबॅको स्ट्रीक या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे शेत, बांध आणि परिसर तणमुक्त ठेवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यासह जळगाव, सांगली, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून शेतकरी बांधव सहभागी झाले होते. त्यांनी सोयाबीनवरील कीड, नियंत्रणासाठी कीटकनाशके, पिकांची योग्य वाढ याबरोबरच खत, तण  व्यवस्थापन यासह सोयाबीन वरील चक्रीभुंगा, सोयाबीनचे पाने पिवळे पडणे, फळबाग आणि हळद पिकातील विविध समस्या बाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचे विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ गजानन गडदे, डॉ.अरविंद पांडागळे, डॉ. बसवराज भेदे, डॉ. कैलास डाखोरे. डॉ. अनंत बडगुजर, यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. या कार्यक्रमात सर्व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, क्षेत्रीय कृषि अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, रावेचे विद्यार्थी आणि बहुसंख्येने कृषि शेतकरी बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.