Saturday, July 27, 2024

ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवादामध्ये शेतीविषयक प्रश्नोत्तरावर भर द्यावा ... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा चौथा भाग मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७ जुलै  रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० दरम्यान संपन्न झाला. यावेळी  लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, छत्रपती संभाजीनगर विभागाचे डॉ. तुकाराम मोटे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बाऱ्हाटे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.

यावेळी  बोलताना कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की ग्रामपातळीवरील हवामानाचा अचूक अंदाज मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येते का? याविषयी विद्यापीठाच्या हवामान विभागास सूचित केले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि हा कार्यक्रम शेतीविषयक प्रश्नोत्तरावर भर देणारा ठेवावा असे नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये हवामान तज्ञ डॉक्टर कैलास डाखोरे यांनी पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगितला व पुढील हप्त्यात पर्जन्यमान कमी असेल म्हणून शेतातील मशागतीचे कामे करण्यासाठी  लाभदायक ठरणार आहेत असे नमूद केले.

कापूस तज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकातील खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना खत देण्याच्या अचूक पद्धतींचे वर्णन करून खत देताना खत मातीमध्ये मिसळेल याची दक्षता घेण्याचे सांगितले तसेच पीकास अन्नद्रव्याची कमतरता असते म्हणून माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा आणि जर माती परीक्षण शक्य नसेल तर ग्रेड १ सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जमिनीमध्ये देण्यासाठी करावा आणि फवारणीद्वारे ग्रेड २ च्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा असे नमूद केले. याबरोबरच त्यांनी कापूस पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीचे वेळापत्रकही सांगितले. 

तदनंतर कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी सद्यस्थितीत तूर पिकाचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. सध्या सततचे पर्जन्यमान असल्यामुळे आणि सूर्यप्रकाशाचे कमतरता असल्यामुळे तुर पिकाचे पाने पिवळे पडले आहेत, यासाठी ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी तसेच बुरशीमुळे होणाऱ्या रोगासच्या प्रतिबंधासाठी विद्यापीठ विकसित बायोमिक्सची आळवणी करावी. याबरोबरच तुरीच्या चांगल्या उत्पन्नासाठी तुरीचा शेंडा खुडण्याची योग्य पद्धत सांगितली, यामध्ये तुरीचा शेंडा ४५ दिवसानंतर म्हणजे साधारणपणे पेरणीपासून चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान वरून तीन ते चार इंच खोडावा असे नमूद केले आणि फक्त एकदाच शेंडा खुडण्याची शिफारस असल्याचे स्पष्ट केले. 

यावेळी नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बाऱ्हाटे यांनी हा उपक्रम ग्रामपातळीवर ग्राम पंचायती समोर समूहा मध्ये पाहण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे मत व्यक्त केले.तसेच यावेळी शेतकऱ्यांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमामध्ये विविध जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.