वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला दिनांक २ जुलै रोजी माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी भेट दिली. ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान जर्मनी, जपान, इटली या प्रगत देशात प्रचलित होत असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पिक लागवड हे दोन्ही बाबी शक्य होणार आहेत. म्हणून विद्यापीठाद्वारे या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले असून माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी या प्रकल्पाच्या दैनंदिन कार्याची तपासणी केली. त्यांच्या समवेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, जर्मनीचे मार्गदर्शक अभियंता राहुल एडलापल्ली, रिन्यु पावर चे अभियंता रामजी प्रजापती, प्रकल्प प्रमुख डॉ गोदावरी पवार, डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थित होते.
भेटीदरम्यान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा आणि पुढील कार्यासाठी दिशा देवून महिला कामगारांच्या सुरक्षितते संदर्भात मार्गदर्शनाबरोबरच संबंधित प्रकल्प हा सौर ऊर्जा निर्मिती व सौर्यशक्तीशी निगडित असल्यामुळे अशा ठिकाणी शेतीची कामे करत असताना आवश्यक असलेली सुरक्षा अमलात आणाव्यात असे निर्देश माननीय कुलगुरू यांनी केले. यावेळी संबंधित प्रकल्पाद्वारे नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून एक वर्षापासून चालू असलेल्या संशोधनाचा कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.