Monday, July 1, 2024

वनामकृवित हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

 वसंतराव नाईक हे  दूरदृष्टी महान व्यक्तिमत्व...... माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. विद्यापीठातील स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मारकाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, वसंतराव नाईक यांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी अधिक कठीण होता. या काळात अन्नधान्य तुटवडा भासत होता आणि  अन्नधान्याची  आयात करावी लागत असे, तसेच आयात केलेले अन्नधान्यही निकृष्ठ दर्जेचे असे. तेही मिळण्यासाठी राशनच्या दुकानावर गर्दी होवून मोठमोठ्या रांगा लागत होत्या. अशा कठीण काळात खंबीरपणे शेती विकास करण्यासाठी वसंतराव नाईक अग्रगणी राहिले आणि कृषी क्षेत्रामध्ये हरितक्रांती आणली. त्यांनी अन्नधान्यांमध्ये तसेच दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रास स्वावलंबी बनवले.  याबरोबरच १९७२ मध्ये प्रांतवार महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठाची निर्मिती केली व राष्ट्रीय पातळीवर चार कृषि विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. याद्वारे शेतीमध्ये विज्ञानास प्रोत्साहन दिले गेले. त्यांनी जल आणि मृद संधारण साधून शेती मध्ये तसेच रोजगार शैक्षणिक, ग्रामविकास अशा अनेक समस्या सोडविल्या व महाराष्ट्रास  योग्य दिशा दिली. ते दूरदृष्टी आणि महान व्यक्तिमत्व होते त्यांचे आपण सर्वांनी अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे, आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि रावे उपक्रमाचे विद्यार्थी मोठया संख्‍येने  उपस्थित होते. याप्रसंगी कृषि महाविद्यालय परभणीच्या राष्‍ट्रीय सेवा योजनेद्वारे माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते वृक्षलागवड करण्‍यात आली.