Saturday, July 20, 2024

वनामकृविद्वारा शेतीकामातील महिलांचे श्रम बचतीच्या अवजारांचे संसाधन केंद्र स्थापन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील भाकृअप - केंद्रीय कृषिरत महिला संस्थान अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प- कृषिरत महिला या योजनेद्वारे महिला उपजीविका सुरक्षितताद्वारे सक्षमीकरण आणि शेतीशी निगडीत श्रम बचतीचे अवजारे संशोधनाचे कार्य सुरु आहे.  या योजने अंतर्गत परभणी तालुक्यातील पोखर्णी आणि दैठणा ही दोन गावे दत्तक घेण्यात आलेली आहेत. या गावामध्ये कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे व त्यांच्या कुटुंबाचे सक्षमीकरणाचे कार्य मागील काही वर्षापासून सुरू आहे. या कार्यास अधिकची बळकटी देण्यासाठी केंद्रीय कृषिरत महिला संस्थानच्या संचालिका माननीय डॉ. मृदुला देवी यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिनांक १९ जुलै रोजी परभणी येथे भेट दिली. दरम्यान त्यांनी परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृ.) आणि दैठणा या गावात भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाची पहाणीसाठी दौरा केला. यावेळी योजनेतील लाभार्थी महिलांनी अतिशय उत्साहाने संचालिका डॉ. मृदुला देवी यांचे पारंपरिक पद्धतीने उत्सहात स्वागत केले व मुक्ता कच्छवे या विद्यार्थीनींने त्यांचे चित्र रेखाटून त्यांना भेट दिले. यावेळी केंद्रीय समन्वयिका डॉ. सुनिता काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड, डॉ. सुनिल जक्कावाडडॉ. जयश्री रोडगे. दैठणाचे सरपंच सौ. उज्वला कच्छवे व पोखर्णीचे सरपंच श्रीमती कौशल्या येडके आदींची उपस्थिती होती.

पोखर्णी व दैठणा येथे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प- कृषिरत महिला या योजनेअंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड यांनी विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी यांच्या सहकार्यातून स्थापित करण्यात आलेल्या शेतीकामातील महिलांचे श्रम बचत अवजारे तसेच उपजीविका सुरक्षितताद्वारे  सक्षमीकरणसाठी आणि  विकसित पोष्टिक पदार्थांच्या फलक यांच्या संसाधन केंद्रांचे उद्घाटन संचालिका डॉ. मृदुला देवी यांच्या हस्ते करण्यात आले. या संसाधन  केंद्रातील अवजारे व साधने शेतकरी महिलांसाठी शेतीकामातील कष्ट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या साधनाद्वारे महिलांचे शेतीकामातील श्रमाची व वेळेची बचत होणार आहे. यावेळी दोन्हीही गावामध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये पोखर्णी येथे मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते तसेच  वाचनासाठी घाडीपात्रिका आणि पुस्तके तसेच प्रशिक्षित शेतकरी महिलांनी बनवलेल्या भरडधान्याच्या खाद्य उत्पादनाचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मृदुला देवी, म्हणाल्या की, महिलांनी केवळ घरकामातच गुंतून न राहता उद्योगाकडे वळावे व स्वावलंबी बनावे, यासाठी योजनेद्वारे विविध उपजीविकेच्या सुरक्षा घटकांचा अवलंब करून आपले सक्षमीकरण साधण्यासाठी प्रेरित केले. तसेच त्यांनी शेतकरी महिलांशी कृषी आणि संबंधित क्षेत्रांमधिल अडचणी बद्दल विचारणा करून संवाद साधला. तसेच प्रकल्पातंर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित शेतीकामातील सुरक्षिततेसाठी ५००० हातमोजे तयार करुन शेतकरी महिलांना उपलब्ध करुन देवून व त्यामध्यमातून आर्थिक उन्नती साधणाऱ्या श्रीमती शीतल कच्छवे आणि अपर्णा कच्छवे यांचे व योजनेतील शास्त्रज्ञांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमात योजनेच्या घटक समन्वयिका डॉ. सुनिता काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञा डॉ. नीता गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

या प्रसंगी योजनेतील लाभार्थी, श्रीमती गंगुबाई कच्छवे, श्रीमती शीतल कच्छवे, श्रीमती वैशाली गायकवाड, श्रीमती सोनाली गायकवाड, श्रीमती समीना शेख, यांनी प्रकल्पामुळे त्यांना झालेल्या फायदा व त्यांनी विकसित केलेले जिवनकौशल्य या विषयी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात उपसरपंच श्रीमती राधाबाई वाघ, देवस्थानचे अध्यक्ष श्री मंचकराव वाघ, अंगणवाडी शिक्षिका अश्विनी वाघ, सीआरपी गायत्री पुजारी, अंजना लोखंडे, तसेच पोखर्णी येथे २०० महिलांनी तर दैठणा येथे २५० महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग प्रोफेशनल्स श्री. प्रसाद देशमुख, नवाल चाऊस, संध्या शिंदे आणि अयोध्या गायकवाड, अमेर तसेच पोखर्णी येथील नृसिंह मंदिर संस्थान कर्मचारी, दोन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावातील सीआरपी, अंगणवाडी शिक्षिका, बचतगट अध्यक्ष्या यांनी  पुढाकार घेतला.