Tuesday, July 2, 2024

वनामकृवितील कृषि विस्तार शिक्षण विभागात कृषि दिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथिल कृषि विस्तार शिक्षण विभागात दि. १ जुलै रोजी "कृषि दिन" मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सुरुवातीस महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजन विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागातील प्राध्यापक डॉ. सुनील जक्कावाड, डॉ. प्रविण कापसे, प्रा.राजेंद्र सावंत आणि डॉ. अनुराधा लाड आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमात बोलताना विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी कृषि दिन साजरा करण्याचे महत्व सांगितले आणि वसंतराव नाईक यांच्या राजकीय संघर्षाबरोबरच त्यांनी महाराष्ट्राची कायापालट केली नसून सर्व देशाला नवी दिशा दाखवली असे वर्णन केले. आज कृषिदिनाचे औचित्य साधून विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विविध ठिकाणच्या कृषि महाविद्यालयातील सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या (रावे) ३२०० विद्यार्थ्यामार्फत संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविले जाते, शिवाय त्यांच्याद्वारे आज वृक्षारोपण करून कृषि दिन साजरा केला जात असल्याचे नमूद केले. याप्रसंगी त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपला संशोधनाचा विषय निवडताना शेतकऱ्यांच्या समस्येशी निगडीत निवडावा असे आव्हान केले.
तदनंतर डॉ. प्रविण कापसे यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषि क्षेत्रतिल योगदानाबादल मार्गदर्शन केले. तसेच श्री. विनायक हेगाणा नावच्या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्यांचे अनुकरण करून शेतकऱ्यासाठी कार्य करावे व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दुष्टीने काम करावे असे आव्हान केले. यानंतर प्रा. राजेंद्र सावंत यांनी वसंतराव नाईक यांच्या राजकिय, सामाजिक कार्याबादल माहिती संगितली.
कार्यक्रमात आचार्य पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी गोविंद भोसले, अभिषेक हिवराळे, प्रशिल कांबळे, गौरव गिरी, प्रतीक मडके आणि विद्यार्थीनी युगंधरा पगारे, यांनी महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व कृषि दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अंकुश खांडरे यांनी केले तर आभार रेणुका बांगर यानी मानले.