सद्यस्थितीत सोयाबीन पिकातील कीड व तण व्यवस्थापनावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ
कृषि संवाद कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालकाच्या पदावर नुकतेच रुजू झालेले डॉ.
भगवान आसेवार यांच्या संकल्पनेतून झाली असून दिनांक १२ जुलै रोजी कार्यक्रमाचा
दुसरा भाग संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू
डॉ. इन्द्र मणि यांनी, पिकांमध्ये हवामान बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव कशाप्रकारे वाढतो,
याचा अभ्यास करून त्याच्या नियंत्रणासाठी सोप्या
पद्धतींच्या शिफारशी देण्याचे निर्देश शास्त्रज्ञांना दिले. तसेच शेतकऱ्यांनी
कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा आणि दोन्ही बाजूने संभाषण ठेवून आपले
शेती संबंधी प्रश्न विचारावेत. यातून संशोधनाची दिशा ठरवून उपयुक्त तंत्रज्ञान
विकसित करण्यास मदत मिळेल. याबरोबरच अनेक प्रकारे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल. नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आणि शासनाच्या शेतीउत्पनात
घट येते असा दुहेरी तोटा होतो. याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी,
कृषि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपातळीवरील
कार्य करणाऱ्या विस्तार कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन
केले. तसेच त्यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्र राज्यास नुकताच केंद्राचा उत्कृष्ट कृषि राज्य म्हणून
बहुमान मिळाला आहे. हा बहुमान स्वीकारण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री
श्री एकनाथजी शिंदे यांनी हा बहुमान दिल्ली येथे एका मोठ्या समारंभात स्वीकारला.
या समारंभात मी सहभागी झालो होतो. या
समारंभातील क्षणांचे वर्णन करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे
त्यांनी अभिनंदन केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी स्पष्ट करून
हा कार्यकम आठवड्यातून एक दिवस सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाइन आयोजित केला
जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार आणि वेळेत माहिती मिळणार असल्याचे नमूद
केले.
तांत्रिक मार्गदर्शनामध्ये
सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा पुढच्या पाच
दिवसाचा सविस्तर तर पुढील पंधरा दिवसाचा पावसाचा अंदाज दिला. तसेच जुलैमध्ये
चांगला पाऊस पडेल म्हणून पिकामध्ये पाणी साचणार नाही याची आणि जनावरांना चिखलामुळे
रोग होवू नयेत म्हणून त्यांचीही काळजी घ्यावी असे नमूद केले.
तदनंतर कृषि तंत्रज्ञान माहिती
केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी पीक उगवणी पश्चात तण व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना
सांगितले की, पेरणी
नंतर पहिल्या ४५ दिवसात तणाची आणि पिकांची अन्नद्रव्य,
पाणी, जागा यासाठी स्पर्धा होत असते,
म्हणून या काळात तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी कोळपणी, निंदणी
सारख्या पारंपारिक पद्धती सोबतच विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तणनाशकाचा अवलंब
करावा आणि तणनाशक फवारताना किमान १५० ते २००
लिटर पाणी एकरी वापरण्याचा तसेच तणनाशक वापरताना आवश्यक ती खबरदारी
घेण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला. यानंतर सोयाबीन मधील किडी यांच्या नियंत्रणासाठी
डॉ. राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन करताना विविध उपायोजना सुचविल्या.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक आणि कृषि विभागाचे अधिकारी बहुसंखेने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले तर आभार उपसंचालक डॉ. सुर्यकांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, संगणक कार्यालयाचे डॉ. संतोष फुलारी, श्री. डि. व्ही. इंगळे, श्री. योगेश मात्रे आणि श्री खंदारे यांनी पुढाकार घेतला.