Monday, July 8, 2024

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय गोळेगाव द्वारा हट्टा येथे वृक्षारोपण आणि जागरूकता फेरीचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या, कृषि महाविद्यालय गोळेगाव येथील सातव्या सत्रात ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमातील कृषि दूत आणि कृषि कन्या यांच्याद्वारा हट्टा ता. वसमत येथे दिनांक जुलै रोजी वृक्षारोपण आणि जागरूकता फेरीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करून शाळेमध्ये तसेच गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी हट्याचे सरपंच श्री दीपक हतागळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री. प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष श्री. विनोद खाडे, मुख्याध्यापक श्री. मधुकर काळे आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमात बोलताना डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी तसेच जमिनीच्या आरोग्याबरोबरच जमिनीची धुप रोखण्यासाठी वृक्षरोपण करणे आवश्यक आहे. मृद जल संधारणासाठीही वृक्ष लागवडीचे महत्व असुन वातावरणात होणारे बदल याद्वारे टाळता येतील असे नमूद केले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. मधुकर काळे आणि कृषि कन्या वैष्णवी मस्के यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

तद्नंतर गावामधुन जागरुकता फेरी काढण्यात आली. जागरुकता फेरी दरम्यान जैविक शेतीचे महत्व पटवून देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या तसेच सामाजिक जीवनातील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकण्याकरिता आणि मुलांनाही आपल्या शेतकरी मातेविषयी अभिमान वाटावा म्हणून शेतकरी महिला सन्मानार्थ विद्यार्थ्यांच्या "शेतात राबते माझी माय, तीच्या कष्टाला तोड नाय,” "शेतकरी मातेचा आम्हाला, गर्व तिची काळजी घेऊ आम्ही सर्व,” "शेतात राबते आई सतत, घरकामात तिला करु मदत,” "घरात - शेतात कामच काम, शेतकरी महिलांना आमचा सलाम,” "निंदणी - खुरपणी करते माझी माय, जणू काही तिच्या हाती जादूच हाय,”. अशा घोषणांनी सर्व गाव दणाणुन गेले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले तर सूत्रसंचालन कृषि कन्या तेजल पाटील यांनी आणि आभार शीतल गरुड यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शंकर पुरी, तसेच हट्टा येथील रावेचे कृषि दूत आणि कृषि कन्या यांनी केले. कार्यक्रमासाठी रावेचे विषय विशेषज्ञ डॉ. पी. के. राठोड, डॉ. आर.व्ही. भालेराव, इंजि. संजय पवार  यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच या  उपक्रमाचे लिंगी व तेलगाव येथील विद्यार्थी उपस्थित होते.