शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासावर भर... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
विस्तार शिक्षण संचालनालय, कीटकशास्त्र विभाग आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त
विद्यमाने पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०२४-२५ (क्रॉपसॅप) अंतर्गत
दिनांक २६ जुलै रोजी मराठवाड्यातील कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची तसेच सर्व
कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विषयातील विषय विशेषज्ञांची एक दिवसीय
विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक
म्हणून माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी इंफाळ येथील
केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉ. सुभाष पुरी हे होते.
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक श्री तुकाराम मोटे, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. संजीव
बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. संदीप बडगुजर, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी श्री. अनिल गवळी, क्रॉपसॅपचे समन्वयक तथा सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड आदींची
उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विस्तार शिक्षण
संचालनालयाद्वारे आयोजित ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमाचे आणि
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राद्वारे विकसित विद्यापीठाचा व्हाट्सॲप क्रमांक
८३२९४३२०९७ कार्यान्वित करून व्हाट्सॲप चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या न्यूज लेटर, शेतीभाती मासिक आणि रेशीम
उत्पादन तंत्रज्ञानाच्या मोबाईल ॲपचे विमोचन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी आणि शेती विकासासाठी विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण
संचालनालय एकसंघ होऊन कार्य करत असून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी
विज्ञान केंद्रे यांचे अधिकारी, कर्मचारी सेवाभावाने
शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहेत. शेती विकासासाठी महाराष्ट्राची शासकीय रचना अतिशय
उत्कृष्ट असून विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान कृषी विभाग आणि कृषी विज्ञान
केंद्राद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविले जाते म्हणून हे तीनही विभाग एकमेकांशी
पूरक असे आहेत. विद्यापीठाने शेतकरी विकासासाठी नवनवीन योजना आखलेल्या असून माझा
एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी
प्रत्यक्ष शेतावर जावून तर दर शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषी संवाद राबविला
जातो, यासोबतच क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत पिकावरील कीड रोग सर्वेक्षणाच्या आधारे
योग्य सल्ला देण्यात येतो. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
देण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्यातून छत्रपती संभाजीनगर येथील
विद्यापीठाच्या कृषी तंत्र विद्यालय परिसरात रुपये पंधरा कोटीचे मराठवाडा शेतकरी
प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यापीठ
शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासावर भर देत आहे. शेतकऱ्यांचा विकास झाला तरच
शास्त्रज्ञांचे आणि कृषी अधिकाऱ्यांचे अस्तित्व टिकेल. शेतीविकास साधण्यासाठी
शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकावर न थांबता फलोत्पादन, भाजीपाला
उत्पादन व प्रक्रिया उद्योगाकडे वळावावे तसेच शेतीमध्ये ड्रोन सारख्या आधुनिक यांत्रिकीकरणावर
भर देण्यासाठी प्रोत्साहित करावे असे नमूद केले.
प्रमुख अतिथी इंफाळ येथील केंद्रीय विद्यापीठाचे
माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांनी मागील दोन वर्षातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या प्रगतीचा उल्लेख करून विद्यमान कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांचे
अभिनंदन केले व पुढे म्हणाले की, पिकांवर येणाऱ्या किडींची कल्पना मिळावी हाच क्रॉपसॅपचा मुख्य उद्देश आहे.
हवामान बदलामुळे किडींचे व रोगांचे प्रमाणात वाढ होत आहे तसेच रासायनिक औषधांचे
प्रभावीपणे प्रभाव होत नाहीत, म्हणून किडी व रोगांचा
प्रादुर्भावाच्या पातळीची व शेतकऱ्यांच्या प्रत्याभरणाची माहिती देणारी एक
राष्ट्रीय पातळीवर यंत्रणा असावी. या यंत्रणेच्या माहिती आधारे विद्यापीठाचे
संशोधन कार्य करण्यास मदत मिळेल असे नमूद केले. तसेच पूर्वीच्या प्रशिक्षण आणि भेट
योजनेच्या कार्यास उजळणी देऊन योजनेतील कृषी सहाय्यक आणि विस्तार कार्यकर्त्यांची
शेतकऱ्यांची जवळीकता साधली जावून मानसिक आधार देण्याचेही कार्य होत होते व याद्वारे
आत्महत्याचे प्रमाण कमी होते, म्हणून सर्व कृषी सहाय्यक आणि
प्रशिक्षण आणि भेट योजनेतील कार्यासारखे कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
यांनी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य वेळी सल्ला देऊन नुकसान टाळण्यास
मदत झाली. या योजनेचा परिणामाचा अभ्यास करून योजनेस बळकटी देण्यात येईल असे नमूद
केले. याबरोबरच विद्यापीठाचे सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात येत असलेल्या विस्तार
कार्याची माहिती दिली. तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सन २००८-०९ मध्ये
प्रथमतः या विद्यापीठातून सुरु झालेल्या क्रॉपसॅप योजनेच्या उदयाचा इतिहास नमूद
करून, हा प्रकल्प प्रभावी व
सजगतेने राबविण्याचे आवाहन केले. तद्नंतर
शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी, ग्रामीण जागरूकता
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षणासोबतच विद्यापीठाचे तंत्रज्ञान आणि
क्रॉपसॅप योजनेच्या कार्य ग्रामपातळीवर पोहोचविण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन
केले.
विभागीय कृषी सहसंचालक श्री रावसाहेब दिवेकर
म्हणाले की, क्रॉपसॅप
योजनेद्वारे मागील सतरा वर्षापासून केलेल्या कार्यामुळे किडींचा मोठा प्रादुर्भाव
आढळत नाही, हे या योजनेचे मोठे यश आहे. तसेच भविष्यात
गोगलगाय, लष्करी अळी यासारख्या किडींचा चोख बंदोबस्त
करण्यासाठी अधिकाऱ्यांना अवगत केले आणि तूर, सोयाबीन,
कापूस आणि मका या पिकांचे कीड नियंत्रण करण्यासाठी कार्य करण्याचे
आवाहन केले. तसेच विभागीय कृषी सहसंचालक श्री. तुकाराम मोटे यांनी ही योजना
प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच माहितीचा योग्य उपयोग करून काळजीपूर्वक कार्य
करण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांना निर्देशित केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग
प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर
आभार प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड यांनी मानले.
तांत्रिक सत्रात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा समन्वयक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ यांना विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ तथा प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. बसवराज भेदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे तसेच रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संदीप बडगुजर, कापूस विद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे, प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी मेहत्रे, हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी विविध विषयावर प्रशिक्षण दिले व शेवटी डॉ. राजरतन खंदारे आणि डॉ. योगेश मात्रे यांनी उपस्थितांचे शंका समाधान केले.