वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्य शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे केले जाते. यातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या संचालक पदी डॉ. भगवान आसेवार यांची विद्यापीठ प्रशासनाने नुकतीच नेमणूक केली असून ते या पदी दिनांक १ जुलैपासून रुजू झाले आहेत. विस्तार शिक्षण संचालनालयाच्या भविष्यातील योजनेबद्दल बोलताना डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, विद्यापीठाचे कार्य माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी केंद्रीत सुरू आहे. या अंतर्गत ‘एक दिवस माझा माझ्या बळीराजा सोबत’ सारख्या नाविन्य उपक्रमासह विविध सामाजिक माध्यमांच्या वापर याबरोबरच शेतकरी मेळावे, प्रशिक्षणे, कार्यशाळा, समूह चर्चा, बैठका, किसान गोष्टी, शेतकऱ्यांच्या शेतावरच्या भेटी, निदान चमू भेटी इत्यादी माध्यमांचा प्रभावी अवलंब करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तंत्रज्ञान पोहचवले जाईल. तसेच विद्यापीठाची वृत्तवाहिनी कार्यान्वीत करून हंगामानुसार आणि वेळेनुसार हवामान व शेती सल्ला याबरोबरच विद्यापीठ विकसीत नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविले जाईल असे त्यांनी नमूद केले.
डॉ. भगवान आसेवर यांचा अल्प परिचय
परभणी
जिल्ह्यातील पोखर्णी (नृ.) हे त्यांचे मुळगाव असून त्यांचा जन्म १९७१ साली झाला.
त्यांनी आचार्य एन. जी. रंगा कृषि विद्यापीठ, हैदराबाद येथून कृषी विद्या विषयात आचार्य
पदवी प्राप्त केली. विद्यापीठ सेवेत १९९७ साली
वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर रुजू झाले व पुढे काही टप्पे पदोन्नतीने तर कृषि विद्या
विभागाचे विभाग प्रमुख पदी नामनिर्देशनाने रुजू झाले. तदनंतर त्यांच्याकडे
विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, गोळेगावचा सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य या
पदाचा पदभार जुलै २०२१ पासून सोपविण्यात आला आहे. सध्या या पदाच्या पदाभारासह विस्तार
शिक्षण संचालक पदाचा पदभार दिनांक १ जुलै २०२४ पासून सोपविण्यात आलेला आहे.
त्यांनी कोरडवाहू शेती, पीके आणि पीक पद्धती, पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, कृषी हवामानशास्त्र आणि वातावरण बदल या क्षेत्रामध्ये विशेष संशोधन केलेले आहे. या संशोधनाची दखल घेऊन त्यांना नवी दिल्ली येथी भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्वारा कोरडवाहू शेती संशोधन आणि त्याचे अवलंबन याकरिता वसंतराव नाईक पुरस्काराने २०१८ मध्ये गौरविण्यात आले, याबरोबरच उत्कृष्ट भित्तीपत्रक प्रदर्शन पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन पुरस्कार, नवी दिल्ली येथील भारतीय कृषिविद्या संस्थेचा फेलो पुरस्कार आणि उत्कृष्ट लेख सादरीकरण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत ७५ संशोधन लेख प्रकाशित केले आहेत तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ५८ परिसंवादामध्ये संशोधन लेखाचे सादरीकरण केले आहे. यातील पाच संशोधन पेपर हे लीड पेपर म्हणून सादर केले होते. त्यांनी आयएसबीएन नंबर प्राप्त दहा पुस्तकांमध्ये लेख लिहिलेले आहेत. डॉ आसेवर यांची १५ बुकलेट, १० दूरदर्शनवरील संवाद, १५ रेडिओवरील भाषणे, १२ घडी पत्रिका, आणि ७५ मराठी मधून लेख अशी मोठी लेखन संपदा प्रकाशित झालेली आहे. तसेच त्यांनी कोरडवाहू शेतीविषयी दोन मोबाईल ॲप विकसित केले असून ते सामाजिक माध्यमाचा प्रभावी वापर करत आहेत. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ७ वैज्ञानिक आणि व्यावसायिक संस्थांचे सभासद आहेत. त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, यांचे यशस्वी आयोजन केले आहे.