Thursday, July 11, 2024

पदव्युतर कृषि अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न





पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेद्वारा पदव्युतर पदवी कृषि अभ्यासक्रमाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक १० जुलै रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान विद्यापीठाचे कुलगुरू माडॉइन्द्र मणि यांनी आभासी माध्यमाद्वारे भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे होते तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सय्यद  इस्माईल, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे आणि जिमखाना उपाध्यक्ष,  डॉ. पुरूषोत्तम झंवर आदींची उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉइन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आभासीमाध्यमाद्वारे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी साठी फक्त एमसीएइआरची तयारी न करता आयसीएआर च्या परीक्षेचीपण तयारी करून एसआरएफ  मिळवावी व भारतातील  इतर राज्यातील नामांकित विद्यापीठामध्ये देखील पदव्युत्तर पदवी साठी प्रवेश मिळवावा असे आव्हान केले. तसेच संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके म्हणाले की, इतर विद्यापीठ्यांच्या मानाने या विद्यापीठात संसाधने किंवा भौतिक सेवा सुविधा, संशोधनासाठी लागणारे साहित्य व उच्च शिक्षित प्राध्यापक हे उपलब्ध आहेत. याबरोबरच विद्यार्थी कठोर परिश्रम करतात आणि अशा परीक्षांमध्ये यश मिळवतात हे अभिमानास्पद आहे, त्यामुळेच राज्यस्तरावर परभणीची ओळख निर्माण होत आहे, असे प्रतिपादन केले.

या नंतर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद  इस्माईल हे विद्यार्थीच्या यशाबद्दल अभिमान असल्याचे म्हणाले. या महाविद्यालयाचे विद्यार्थी २०१८ या वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहेत आणि यापुढेही हि परंपरा ते नक्कीच सुरु ठेवतील. त्यांचा सत्कार करणे आणि त्यांचे कौतुक करणे ही आमची जबाबदारी आहे असे नमूद केले. तसेच प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम झंवर, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, सहयोगी प्राध्यापक डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आलेला विद्यार्थी निखिल पाडोळे व इतर ३० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नरेंद्र कांबळे व डॉ. अनुराधा लाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संजना भांडारवार व कु. गायत्री खोडके या विद्यार्थीनिनी केले. कार्यक्रमास सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.