Thursday, July 11, 2024

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 विद्यापीठाचा माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा अभिनव उपक्रम दिनांक १० जुलै रोजी संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात आला. विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण १७ चमूमधिल ५५ शास्त्रज्ञांनी आणि सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील २७ गावातील १०२६ शेतकऱ्यांना विविध विषयावर प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांनी मौजे पिंप्री देशमुख येथे विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम उपक्रमाबाबत आणि विद्यापीठाचे शेतीविकासातील योगदान या विषयी  माहिती देवून विद्यापीठ शेतकरी केंद्रीत कार्यावर भर देत असून शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ सदैव कार्यरत असल्याचे नमूद केले. तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नांदेड जिल्ह्यातील मौजे तळ्याची वाडी येथे विद्यापीठाचे तंत्रज्ञान अवलंबून खरीप पिकाचे व्यवस्थापन करण्याविषयी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.  

याबरोबरच विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना खरीप पिकाचे व्यवस्थापन, तण, खत, सिंचन,  पीक संरक्षण व्यवस्थापन यासह फळबागेचे व्यवस्थापन आणि महिला शेतकऱ्यांना पोषण बाग, शेत्कामातील श्रम बचतीचे साधने, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ याविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण केले.

प्रक्षेत्र भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर पेरणी केलेल्या क्षेत्रास, शेडनेट, नर्सरी तसेच फळबागेस भेटी दिल्या. तर सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांनी हिंगोली जिल्ह्यातील अडगाव (रंजे) येथील शेतकऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले आणि शाळेच्या शिक्षकांसोबत अध्यापनाच्या बाबतीत समुपदेशन करताना विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे गरजेचे असून त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.