Saturday, July 6, 2024

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय गोळेगाव येथे संग्रहालयाचे उद्घाटन आणि बायोमिक्स विक्री व्यवस्थेचा शुभारंभ

शेतकऱ्यांचा विकास तरच जिल्ह्याचा विकास होवू शकतो.....मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे महाविद्यालय व बायोमिक संशोधन आणि निर्मिती केंद्र परभणीद्वारा कृषि संजीवनी सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक ६ जुलै रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर हे होते. कार्यक्रमासाठी माजी कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांची विशेष उपस्थिती होती तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे कृषि संग्रहालयाचे उद्घाटन आणि बायोमिक्स विक्री व्यवस्थापनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाने एक संघ होवून कार्य करावे लागेल. कृषि महाविद्यालये तसेच जिल्यातील विद्यापीठाचे संशोधन, विस्तार कार्यालये यांनी त्या – त्या जिल्ह्यासाठीचे कृषि विद्यापीठ म्हणूनच कार्य करावे आणि प्रत्येक कार्यालयाने आपल्या आजुबाजाच्या किमान २५ किमी परिसरामध्ये अतिशय प्रभावीपणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचवावे. शेतकऱ्यांचा विकास तरच जिल्ह्याचा विकास होवू शकतो, म्हणूनच विद्यापीठ शेतकरी केंद्रीत आणि त्यांच्या मागणीनुसार संशोधन आणि विस्तार कार्य करत आहे. याचाच भाग म्हणून विद्यापीठाचा शेतकरी प्रिय बोयोमिक्स या पदार्थाची विक्री विद्यापीठाच्या मराठवाड्यातील बहुतांश कार्यालयाद्वारे केली जाते आणि आज कृषि महाविद्यालाय गोळेगाव येथेही बोयोमिक्स विक्री व्यवस्थापना उभारली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळेची आणि परभणीला येवून खरेदी करण्यासाठीच्या प्रवास खर्चाची बचत होईल. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शास्त्रज्ञाना कामाची गती वाढवून अधिकची मेहनत करण्यासाठी आवाहन केले.

कार्यक्रमात बोलताना माननीय जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनी बोयोमिक्स सारखे उत्पादन विद्यापीठाद्वारे होते आणि ते शेतकऱ्यांमध्ये अतिशय प्रिय उत्पादन असून याची हिंगोली जिल्ह्यासाठी विद्यापीठाने कृषि महाविद्यालय गोळेगाव येथे विक्री व्यवस्थापना उभारली आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकच्या प्रयत्नाची आवश्यकता असल्याचे नमूद करून त्यांनी तंत्रज्ञानाची किफायतशीरता शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्याचे आवाहन केले. यासाठी जिल्ह्यात सर्व विभागाची एकत्रितरीत्या कार्यपद्धती ठरविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन एकत्रित कार्य करील असे नमूद करून म्हणाले की, हिंगोली जिल्हात हळदीचे उत्पादन विपुल प्रमाणात होते, जिल्ह्यात अनेक प्रभावी शेतकरी बचत गटाद्वारे याची विक्री व्यासाथापन होते. परंतु शेतकऱ्यांना पुरेसा नफा मिळत नाही, म्हणून जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाद्वारे व इतर संस्थेद्वारे हळदीवर प्रक्रिया उद्योग उभारावेत असे त्यांनी प्रतिपादन केले. ते याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थीदशेतील आठवणीना उजाळा दिला व त्यांची अभ्यास करण्याची पद्धती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थी असतानाच आपले ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला.

यावेळी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ किशनराव  गोरे, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीही शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात  सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा देवून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माहिती दिली. तसेच बायोमिक्सचा शेतीमध्ये उपयोग व त्याचे फायदे या विषयावर वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी माहिती दिली. सर्व मान्यवरांनी महाविद्यालयातील कृषि अभियांत्रिकी विभागासह इतर विभागांना भेटी दिल्या. शेवटी त्यांच्या हस्ते प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शंकर पुरी यांनी तर आभार डॉ प्रवीण राठोड यांनी मानले.