Monday, June 30, 2025

सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ३० जून रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाइन उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू माननीय डॉ. अशोक ढवण उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, उप कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राहुल रामटेके, डॉ.वासुदेव नारखेडे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होत डॉ. सय्यद इस्माईल यांच्या दीर्घ आणि गुणवत्तापूर्ण सेवेची प्रशंसा केली. त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठवाड्यातील सर्वात जुन्या कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी डॉ. इस्माईल यांची निवड ही अत्यंत योग्य ठरली. सध्याच्या कमी मनुष्यबळाच्या परिस्थितीतही विद्यापीठाचा गाडा सक्षमपणे चालवला जात आहे, हे सर्व प्राध्यापकांच्या योगदानामुळे शक्य झाले आहे. त्यांनी प्राध्यापकांनी नैतिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी डॉ. इस्माईल यांच्या द्रवरूप जिवाणू संवर्धक संशोधनातील महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, अधिष्ठाता पदावर असतानाही डॉ. इस्माईल यांनी विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू ठेवले. त्यांनी महाविद्यालयातील तसेच विविध विभागांची 'भारतीय कृषी अनुसंधान परिषदे'कडून मान्यता मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. ते शांत, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी डॉ. इस्माईल यांच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्यातील योगदानाचे विशेष कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. सय्यद इस्माईल यांनी आपल्या सेवेतील सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यात मराठवाड्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्याला प्राधान्य द्यावे. शिक्षकाने आदर्श जीवन जगले पाहिजे. विद्यार्थ्यांनी हार न मानता ज्ञान संपादन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले. हा कार्यक्रम कृषि महाविद्यालय, परभणी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. सय्यद इस्माईल यांचे नातेवाईक, मित्र परिवार, शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधन क्षेत्रातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.








Sunday, June 29, 2025

कृषि विद्यापीठातील कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमातून करीअरच्या उत्तम संधी

डॉ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भ्र.क्र 7588082056 bangalejaya@gmail.com

भारतामधील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये कम्युनिटी सायन्स (सामुदायिक विज्ञान) अभ्यासक्रम राबवला जात असून महाराष्ट्र राज्यातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कम्युनिटी सायन्स हा राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाप्रमाणेच कृषि विषयांतर्गत असणारा सामुदायिक विज्ञान हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो.   इयत्ता १२वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एसस्सी (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्राप्त होते.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता : विद्यार्थ्याने इयत्ता १२वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा याबरोबरच सक्षम विभागाकडून आयोजित करण्यात आलेली एमएचटी सीईटी/जेईई/नीट सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे. या अभ्यासक्रमासाठी मुला-मुलींना प्रवेश खुला असून शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच विद्यार्थीनींना शुल्काच्या बाबतीत असणाऱ्या सर्व सवलती लागू आहेत.

अभ्यासक्रमाचा कायापालट : विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील विविध आव्हाने पेलण्याकरीता सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी गठीत केलेल्या सहाव्या अधिष्ठाता समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरुन अतिशय उत्कृष्टपणे कम्युनिटी सायन्स या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.

अभ्यासक्रमातील प्रमुख विषय : कम्युनिटी सायन्सच्या ४ वर्षाच्या अभ्यासक्रमांतर्गत अन्न व पोषण, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास, रिसोर्स मॅनेजमेन्ट व कन्झुमर सायन्स, अॅपरल अॅन्ड टेक्सटाईल सायन्स, विस्तार शिक्षण व संदेशवहन व्यवस्थापन या प्रमुख क्षेत्रातील पायाभूत विषय,ऐच्छिक विषय, कौशल्यवृध्दी अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार MOOCs, NPTEL, Coursera,  SWAYAW यासारख्या मान्यताप्राप्त पोर्टलवरील ऑनलाईन विषय, इंटर्नशिप, कृषि विषयाशी निगडीत इतर शाखांच्या विषयांबरोबरच मूल्यवर्धित व क्षमता वाढीसाठी व उद्योजकता विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या विषयांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केला आहे. याबरोबरच युवा पिढीला आकर्षित करणारे आधुनिक अभ्यासक्रम जसे की अॅग्रो इन्फॉर्मेटिक्स अॅन्ड आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, कॉम्प्युटर एडेड इन्टेरिअर डिझायनींग, कॉम्प्युटर अॅप्लीकेशन इन अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन विषयांचाही समावेश या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.

कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमातील करिअर संधी : विद्यार्थ्यांमध्ये या विषयासंबधीचे ज्ञान, कौशल्ये तथा नोकरी-व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मक मनोवृत्ती वृध्दींगत करणारा हा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. शासकीय, निमशासकीय तथा अशासकीय स्तरावर विविध क्षेत्रातील संस्था जसे की जिल्हा रुग्णालय, दवाखाना, क्रिडा कार्यालय, व्यायामशाळा, वसतिगृहे, केंद्रिय राखीव पोलीस दल, रेल्वे विभाग इत्यादी ठिकाणी आहारतज्ज्ञ; याबरोबरच महिला व बाल विकास अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बिहेव्हीयर मॉडिफिकेशन थेरपिस्ट, आयसीडीएस पर्यवेक्षक, सामाजिक कार्यकर्ते, बँक तथा भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH) आयसीएमआर - एनआयएन इत्यादी संस्थामध्ये कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.

याबरोबरच या अभ्यासक्रमात स्किल इंडिया मिशनला अनुसरुन स्टार्टअपला देखील भरपूर वाव असून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघरे, आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, इंटेरीअर डिझायनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हॅन्डीक्राप्टस युनिट, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासारखे व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम केले जाते. तसेच अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लॅन्डस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझायनिंग, निवासस्थाने, व्यावसायिक संस्था व दवाखाने, मॉल्स आदींसाठी गार्डन डिझायनिंग, पुष्प रचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको टुरीझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्माण, हाऊस किपींग, पत्रकारिता, व्हिडिओग्राफी, तथा मार्केटींग यासारख्या अभिनव क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअरच्या फार मोठ्या संधी आहेत.

पूर्व - प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील संधी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेशही शालेय शिक्षणात करण्यात आल्याने लहान बालकांच्या शिक्षणास विशेष महत्व देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना पारंगत केले जात असल्याने भविष्यात त्यांना या क्षेत्रातील करिअर करण्याच्या नामी संधी फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.

उच्च शिक्षणाच्या व स्पर्धा परीक्षांसाठी संधी : या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीएसाठी पात्र असून त्यांना नॅशनल अॅकडमी ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेतून बिझनेस एडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रम या व्यतिरिक्त ते त्यांच्या आवडीच्या विषयात जसे की, स्पेशल एज्युकेटर, स्पीच थेरपी, क्लिनिकल न्युट्रीशन, क्लिनिकल सायकॉलॉजी, बाल व कौटंुबिक समुपदेशन, इंटेरिअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, स्कूल कॉउन्सलर इ. डिप्लोमा अभ्यासक्रम करुनही करिअर घडवण्याच्या संधी आहेत.

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांसाठी नोकरी-व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थामधील संधी : किशोर न्यायालय (JJB), केंद्रीय समाज कल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ, युएनडीपी, युएसडी, एफएओ, डब्ल्युएचओ यासारख्या संस्थामध्येही करिअरच्या संधी आहेत.

आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करण्यास वाव : जेष्ठ नागरीकांसाठी डे केअर होम तथा त्यांच्या स्वत:च्या घरीच त्यांच्या घ्यावयाच्या काळजी विषयक सेवा, कुटुंबातील दिव्यांग बालके/व्यक्ती यांच्यासाठी विशेष सेवा व इंटरव्हेन्शन यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही विद्यार्थी आपले करिअर घडवण्याबरोबरच सामाजिक भान ठेवत आपल्या सेवा प्रदान करु शकतात.

महाराष्ट्र शासनाने कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रम हा कृषि विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य असल्याबाबत तसेच बी.एसस्सी (होम सायन्स) पदवीधारकांना उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी बी.एसस्सी (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स पदवीप्राप्त उमेदवारांनाही उपलब्ध राहतील असे शासन निर्णय निर्गमित केल्याने विद्यार्थ्यांच्या नोकरी-व्यवसायाच्या संधीत वाढ झाली आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी-व्यवसायात तथा वैयक्तिक जीवनात आनंदी व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्ये व सॉफ्ट स्किल्स विकसित करुन एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाकरिताही या अभ्यासक्रमास अनन्यसाधारण महत्व आहे. या महाविद्यालयात सर्व अद्यावत सोयी-सुविधा देखील उपलब्ध आहेत. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाची करिअरच्या बाबतीत असणारी व्याप्ती लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. 

 प्रवेश माहितीसाठी

संपर्क अधिकारी
डॉ. शंकर पुरी
भ्र.क्र ९३२६१०६०३६, ९४०३२४४०४२
संकेतस्थळ : www.mcaer.org



Saturday, June 28, 2025

खरीप हंगामात किडींच्या व्यवस्थापनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा कृषि संवाद कार्यक्रम

 हुमणी व पैसा (मिलीपीड) किडीच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांनी सुचविले उपाय



खरीप हंगामाची सुरुवात झालेली असतानाच हवामानातील अनिश्चिततेमुळे पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पिकांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक बनते. यासाठी वेळेवर व योग्य तंत्रज्ञान उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने मागील वर्षी सुरू केलेल्या ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या उपक्रमाचा ५२वा भाग दिनांक २७ जून २०२५ रोजी संपन्न झाला.

हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

या वेळी खरीप हंगामात पिकांच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या हुमणी व पैसा (मिलीपीड) किडीमुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. यासंदर्भात कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी या किडींच्या जीवनचक्राचे विश्लेषण व नियंत्रण उपायांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी भुंगेरे या किडीचे जीवनचक्र चार अवस्थांमध्ये पूर्ण होते – अंडी (८-१० दिवस), अळी (६-८ महिने), कोष (२-३ आठवडे) व प्रौढ अवस्था (१-३ महिने). एक मादी सुमारे २०–२५ अंडी घालते. अळी अवस्था सर्वात हानीकारक असून मुळे कुरतडून पीक नष्ट करते. तसेच  पैसा (मिलीपीड) किडीचे जीवनचक्र सांगताने म्हणाले की, मादी १०० ते ३०० अंडी घालते. अंडी फुटून बाहेर पडणारी अळी साधारणतः १० अवस्थांमधून जाते. प्रत्येक अवस्थेनुसार अंग व पायांची संख्या वाढते. शेवटी प्रौढ कीड तयार होते. एक प्रौढ कीड ३६ ते ४०० पाय असू शकतात.

या किडींच्या नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकांचा वापर शिफारशीत प्रमाणात करावा, यामध्ये फिप्रोनिल, थायमेथॉक्साम, क्लोथियानिडीन, इमिडाक्लोप्रिड, बायफेंथ्रिन इत्यादींचा समावेश आहे. पीकनिहाय शिफारशींचा वापर करून योग्य प्रमाणात फवारणी/बियाणे प्रक्रिया करावी.

यासाठी त्यांनी एकात्मिक व्यवस्थापन उपायामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक नियंत्रणासोबतच स्वच्छ शेती पद्धती, सेंद्रिय खतांचा समतोल वापर, अळी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी योग्य वेळी कार्यवाही आणि पिकांची फेरपालट यांसारखे उपाय अंमलात आणावेत, या किडींचे जीवनचक्र एक वर्षापर्यंत असते व त्यामुळे एकच पिढी पिकांवर प्रभाव टाकू शकते. पैसा किडीचे जीवनचक्र २-३ वर्षांचे असल्यामुळे तिचे नियंत्रण एकत्रित व दीर्घकालीन उपायांनीच शक्य आहे, असे नमूद केले.

या कार्यक्रमात हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्यातील पावसाचा अंदाज दिला आणि पिकांची काळजी घेण्यासाठी शिफारशी केल्या.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी विविध शंकांची विचारणा केली, त्याचे समाधानकारक निरसन शास्त्रज्ञांनी केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिके, फळपिके आणि पशुधन व्यवस्थापनाविषयीही संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले.






Friday, June 27, 2025

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयातर्फे मंगरुळ येथे जनावरांसाठी फऱ्या व घटसर्प प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयातर्फे अंतर्गत ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम (AIA) अंतर्गत रेशीम संशोधन योजना, जिल्हा पशुवैद्यकीय विभाग, व जिल्हा परिषद, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मंगरुळ, ता. मानवत, जि. परभणी येथे दिनांक २५ जून २०२५ रोजी फऱ्या व घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात कृषि महाविद्यालय, परभणीच्या बी.एस्सी. (कृषि) ७व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमात जनावरांना फऱ्या व घटसर्प रोगाविरोधातील प्रतिबंधक लसी टोचण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. जमीर पठाण (सरपंच) होते, तर उपसरपंच श्री. प्रल्हादराव देशमाने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, रावे कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे,  पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. आर. पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

सरपंच श्री. जमीर पठाण यांनी जुन्या पारंपरिक शेती पद्धतीचे महत्त्व विषद करताना सध्याच्या प्रदूषणयुक्त व दुषित अन्नामुळे मानवामध्ये विविध आजार वाढत असल्याचे नमूद केले.

डॉ. सय्यद इस्माईल यांनी विद्यार्थ्यांनी खेड्यात जाऊन ज्ञानदान’ करण्याचे आवाहन केले व शेतकऱ्यांकडून शेती उद्योग शिकण्याची प्रेरणा घ्यावी, असे सांगितले. डॉ. राजेश कदम (विभाग प्रमुख, तथा मुख्य समन्वयक, रावे कार्यक्रम यांनी सांगितले की, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २५०० विद्यार्थी ‘कृषिदूत’ व ‘कृषिकन्या’ म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करत आहेतडॉ. चंद्रकांत लटपटे यांनी प्रास्ताविकात रेशीम उद्योगातील पशुधनाच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. त्यांनी तुती लागवडीसोबत २ शेळ्या व १ गाय’ शेतकऱ्यांनी पाळाव्यात, असे सांगून, मंगरुळ गावातील २२ जणांनी माजी जिल्हाधिकारी मा. आंचल गोयल यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. आर. पाटील यांनी दुषित अन्नामुळे वाढणाऱ्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच जनावरांमध्ये फऱ्या व घटसर्प रोगांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

शेवटी अशा उपक्रमांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि लसीकरण मोहीमा नियमितपणे राबवाव्यातअशी मागणी ग्रामस्थांनी केली. या कार्यक्रमात वेदांत वरखडे, सिध्दी शिंदे, उन्नती शहाणे, गौरी शिंदे, धीरज शिंदे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन शितल वाघमारे या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन रोहित चव्हाण यांनी केले. 



Thursday, June 26, 2025

राष्ट्रीय सोयाबीन हितधारक कार्यशाळेत परभणी विद्यापीठाचा सहभाग

 केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले उल्लेखनीय सादरीकरण

इंदोर (मध्यप्रदेश) येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान संस्था येथे दिनांक २६ जून २०२५ रोजी सोयाबीन हितधारक कार्यशाळेचे (Soybean Stakeholders’ Workshop) आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान हे होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. एम एल जाट, पीक विज्ञानचे सहसंचालक डॉ. डी. के. यादव,  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेमध्ये माननीय केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या योगदानाचे सादरीकरण करताना म्हणाले की, परभणी विद्यापीठ हे १९७५ पासून सोयाबीन संशोधनामध्ये सक्रिय असून आजपर्यंत विद्यापीठाने एकूण १४ वाण विकसित केले आहेत. यामध्ये एमएयुएस ६१२, एमएयुएस ७२५ आणि एमएयुएस ७३१ हे अलीकडेच विकसित केलेले रोगप्रतिरोधक व ताणसहनशील वाण शेतकऱ्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय ठरले आहेत. मराठवाड्यातील अनेक शेतकरी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकर १० ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन यशस्वीरित्या घेत आहेत. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:या भावनेतून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या दृष्टीने, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा विशेष उपक्रम राबविला जातो. तसेच आठवड्यातून दोन दिवस ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद” घेण्यात येतो. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांनुसार मार्गदर्शन व तांत्रिक उपाय दिले जातात. विद्यापीठ सध्या बीज उत्पादनातही भरघोस यश मिळवत असून काढणी तंत्रज्ञानामध्ये लघु ट्रॅक्टर, रिपर यंत्र आदी उपकरणांचा वापर करून नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याशिवाय विद्यापीठाने शिफारस केलेली रुंद सरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कार्यक्रमादरम्यान माननीय केंद्रीय कृषीमंत्री महोदयांनी असे नमूद केले की, अधिक पाणी किंवा ताण सहन न करणारा सोयाबीन हे उत्पादनातील एक मोठे आव्हान आहे. यावर उपाय विचारल्यावर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी एमएयुएस ७२५ आणि एमएयुएस ७३१ वाणांचा वापर व विद्यापीठाने शिफारस केलेल्या लागवड पद्धतींचे अवलंबन केल्यास हे आव्हान कमी करता येते, असे स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी अधिकाधिक संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. माननीय केंद्रीय कृषीमंत्री महोदयांनी या वेळी मध्यप्रदेशचे माननीय कृषिमंत्री यांच्यासह विद्यापीठाला आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर माननीय कुलगुरूंनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करत त्यांना भेटीचे आमंत्रण दिले.

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातून विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ सुनील उमाटे, परभणी येथील प्रगतिशील श्री. मंगेश देशमुख, श्री. गजानन कदम आणि श्री. संदीप खटिंग हे सहभागी झाले होते. कार्यक्रमात श्री. मंगेश देशमुख यांनीही त्यांची सोयाबीन उत्पादनातील यशोगाथा मांडली. तसेच ते म्हणाले की, विद्यापीठाने सोयाबीन शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बियाणे तसेच उत्पादन व संरक्षणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता करून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, विद्यापीठाचे योगदान देशपातळीवरही उल्लेखनीय ठरत आहे.

या कार्यशाळेत देशातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संचालक, बियाणे संचालक, केंद्र व राज्य कृषी विभागांचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे, तसेच भारतातील सोयाबीन प्रक्रिया उद्योग संघटनाचे प्रतिनिधीखाद्यप्रक्रिया उद्योग, तेल उद्योग, बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसेवी संस्था व प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Wednesday, June 25, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना प्रतिष्ठित “कै. वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्कार २०२५” जाहीर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना “कै. वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्कार – २०२५” हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी दिनांक १ जुलै २०२५ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनीय योगदानाची दखल घेऊन वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्‍ठान यांच्‍या वतीने दिनांक २५ जुन रोजी मुंबई येथील माहिती व जनसंपर्क मंत्रालयाच्या पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत हा पुरस्‍कार माननीय राज्‍यमंत्री मा ना श्री इंद्रनील मनोहर नाईक यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष डॉ राजेन्‍द्र बारवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कै. वसंतराव नाईक कृषि पुरस्कार - २५ संदर्भात, कृषी क्षेत्रात व कृषी क्षेत्राशी निगडित इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांची व संस्थांची नावे जाहीर करण्‍यात आले.

माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन केलेल्‍या उल्‍लेखनीय कार्याची विशेष दखल घेण्‍यात आली. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अत्यंत कुशलतेने कुलगुरू पद निभावत, अल्पावधीतच अभ्यास, संशोधन व प्रशासनिक कार्याच्या माध्यमातून विद्यापीठात नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तारकार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन या दृष्टीकोनातून कार्य करत आहे. त्यांचे कार्य केवळ मराठवाड्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचे आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या तंत्रज्ञान-केंद्रित धोरणांमुळे शाश्वत शेतीव्यवस्थेस चालना मिळाली असून, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे विद्यापीठाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीने 'ए ग्रेड' हे प्रतिष्ठेचे मानांकन प्रदान केले आहे.

त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा (ICAR) ‘भारतरत्न सी. सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, एएसएबीई (ASABE) चा ‘प्रेसिडेन्शियल सायटेशन पुरस्कार’, जलसंपदा मंत्रालयाचा ‘भूजल संवर्धन पुरस्कार’, भारतीय कृषी अनुसंधान संस्था (IARI) चा ‘सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार’, आंतरराष्ट्रीय कृषी व जैवप्रणाली अभियांत्रिकी प्रबोधिनी (IAABE) फेलो, आयएसएई (ISAE) फेलो, ‘भारतीय अभियंता संस्था’चा ‘विख्यात अभियंता पुरस्कार – २०२४’ तसेच ‘वर्षातील कुलगुरू – उत्कृष्ट नेतृत्वासाठी पुरस्कार – २०२५’ यांचा समावेश आहे. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना अमेरिका, दक्षिण आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, जपान आणि युरोपमधील विविध संस्थांमध्ये विद्यापीठीन व्याख्याते म्हणून कार्याचा मोठा अनुभव आहे.


Monday, June 23, 2025

पर्जन्यावर अवलंबून शेती प्रणालींमध्ये शाश्वतता वाढविण्यासाठी राज्यस्तरीय विचारमंथनाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना महाराष्ट्रातील पर्जन्यावर अवलंबून शेती प्रणालींमध्ये शाश्वतता (ताण सहन करण्याची क्षमता) वाढविण्यासाठी आयोजित राज्य पातळीवरील विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींसोबत विचारमंथनच्या उद्घाटनसत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.

या दोन दिवसीय विचारमंथन सत्राला दिनांक २३ व २४ जून २०२५ रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजिन करण्यात आले. महाराष्ट्र रिव्हायटलायझिंग रेनफेड अ‍ॅग्रीकल्चर (महा-आरआरए) नेटवर्क आणि रिव्हायटलायझिंग रेनफेड अ‍ॅग्रीकल्चर नेटवर्क (आरआरएएन) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रआरआरए नेटवर्कचे समन्वयक श्री. साजल कुलकर्णी व श्री. श्रिश जोशी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ श्री विजय कोळेकर भोपाळ येथील यूएई, सीआयएईचे माजी प्रकल्प समन्वयक आणि आरआरए नेटवर्कचे तांत्रिक सल्लागार डॉ. एम. दिन यांची प्रमुख उपस्थिती होती

या परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील शासकीय, स्वयंसेवी संस्था, शेतकरी प्रतिनिधी, कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून पर्जन्याधारित शेतीला अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामान बदलास प्रतिरोधक बनवण्यासाठी विचारमंथन करण्यात येणार आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनातून असे नमूद करण्यात आले की, राज्यातील विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये पर्जन्यावर आधारित स्थानिक पशुपालन, मासेमारी आणि मेंढपाळ समुदायांच्या पारंपरिक व्यवस्थापन पद्धती या पर्यावरणस्नेही असून हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यास सक्षम आहेत. देशी जनावरांच्या माध्यमातून जमिनीचा कस वाढवणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे आणि निसर्ग पुनरुज्जीवन शक्य आहे. बैलांपासून व स्थानिक अवजार निर्मितीमधून उद्योजकतेलाही चालना मिळत आहे. या पारंपरिक व्यवस्थांना शाश्वत विकासाच्या योजनांमध्ये स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे अन्न, उत्पन्न आणि पर्यावरणीय सेवा यांना एकाच वेळी बळकटी देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याबरोबरच ते म्हणाले की, महाराष्ट्र हे हवामान बदलाच्या परिणामांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठाने शाश्वत शेतीसाठी हवामान अनुकूल विविध तंत्रज्ञान विकसित केली आहेत. यामध्ये ताण सहन करणाऱ्या वाणांची निर्मिती, बंधारे, विहिरी, कूपनलिका पुनर्भरण, मराठवाड्यासाठी शेततळ्याचा योग्य आकार, हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञान, जलसंधारण पद्धती यांसारख्या गोष्टींवर संशोधन केले आहे. कोरडवाहू शेतीसाठी ‘रुंद सरी वरंबा’ पद्धतीसारखी तंत्रे तयार करून ती मराठवाड्यात प्रभावीपणे प्रसारित केली आहेत. तसेच विद्यापीठाने विकसित केलेली सर्व बैलचलित अवजारे अतिशय लाभदायक ठरली आहेत. विद्यापीठाचे हे कार्य महाराष्ट्र रिव्हायटलायझिंग रेनफेड अ‍ॅग्रीकल्चर नेटवर्क (Maha-RRA) यांच्या समन्वयाने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या पर्जन्याधारीत भागांमध्ये पोहोचविणे आवश्यक आहे. भविष्यात या नेटवर्कसोबत सामंजस्य करार करून ही तंत्रे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली जातील, असेही त्यांनी सांगितले.

या चर्चासत्रात अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प पशु  संवर्धनाचे यंत्रिकीकरणचे संशोधन अभियंता डॉ. डी. डी.टेकाळे यांनीही सहभाग नोंदविला.

Saturday, June 21, 2025

वनामकृविच्या जालना येथील कृषि तंत्र विद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांनी दिनांक  २१ जून जालना येथील कृषि तंत्र विद्यालयास येथे भेट देऊन विविध शैक्षणिक व प्रायोगिक उपक्रमांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान त्यांनी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया, बिजोत्पादनात येणाऱ्या अडचणी तसेच प्रक्षेत्रातील जमीन वापर यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग हे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत भाजीपाला बिजोत्पादन सुरू करण्यासाठी जालना जिल्ह्यातील विविध खाजगी बियाणे कंपन्यांशी करार करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे कृषि तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्राचा अधिक प्रभावी वापर होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, ड्रोन प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत चर्चा करून अडचणी सोडवाव्यात, जेणेकरून शेतकरी व विद्यार्थी वर्गाला याचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिजोत्पादन प्रक्षेत्रातील रानटी जनावरांपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळावे व अतिक्रमण टाळता यावे यासाठी प्रक्षेत्राच्या उघड्या सीमेवर लाईव्ह फेन्सिंग (बांबू, करवंद इत्यादी) करण्याचे निर्देश देऊन त्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत सरोदे यांनी मान्यवरांचे आभार मानले, यावेळी वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. शेख फारुख व कृषि सहाय्यक श्री. संजय बनछोड उपस्थित होते.


‘एक पृथ्वी, एक आरोग्य’: योगदिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भव्य सामूहिक योगसाधना

वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी, आरोग्याची काळजी महत्त्वाची ... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य व एकाग्रता वाढवते. योगामुळे तनावमुक्त जीवन, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, आणि संतुलित जीवनशैली मिळते. असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि केले. ते २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बोलत होते. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत साजरा करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम कृषि महाविद्यालयासमोरील प्रांगणात भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेल्या २०२५ या वर्षासाठीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम “एक पृथ्वी, एक आरोग्य” आणि  “समर्पण स्वयंसेवक कार्यक्रमनूसार उत्सहात पार पडला.

पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, या दिनाच्या माध्यमातून योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे विद्यार्थ्यांपर्यंत तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. ऋषीमुनींनी दीर्घकाळ निरोगी जीवन जगले, त्यामागे योगाचाच मोठा वाटा होता. आजच्या घडीला आपल्याला स्वस्त आणि निरोगी जीवनासाठी योगाची नितांत गरज आहे. जीवनात वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी, आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि संतुलित आहार यांचे महत्त्व अधोरेखित करत, पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते स्वतः दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे, ३० मिनिटे व्यायाम आणि ३० मिनिटे योगाभ्यास करतात, त्यामुळे त्यांना आजारी पडल्याचे आठवत नाही. योगामुळे मानसिक ताण दूर होतो आणि मन प्रसन्न राहते. सर्वांनी हसतमुख, आनंदी जीवन जगावे, हे अंतर्मनातून स्वीकारावे, असे ते म्हणाले. शेवटी, योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो नियमितपणे अंगीकारण्याचे वचन सर्व उपस्थितांकडून घेतले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी तसेच शिक्षण संचालक भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, प्रभारी कुलसचिव डॉ. गजानन भालेराव, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके,  डॉ गजेंद्र लोंढे,  डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ राजेश कदम आदीं मान्यवर आणि विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक आदींनी मोठया संख्‍येने सहभागी होवून सामुदायिकरित्‍या विविध आसनेप्राणायाम यांचे प्रात्‍यक्षिके केली. यासाठी परभणी येथील निरामय योग प्रसार संशोधन केंद्राचे योगशिक्षक डॉ. दीपक करजगीकर, वैभव गवळी आणि शिवकन्या रेंगे तसेच विद्यापीठाचे डॉ डी. व्ही. सुर्वे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. दीपक करजगीकर यांनी मानवी जीवनासाठी पृथ्वी प्रमाणेच आरोग्याचे महत्व सांगितले. शेवटी त्यांनी वंदना, शांतीपाठ घेतला.

प्रास्‍ताविकात विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यविषयक जाणीवेत वाढ करण्याच्या उद्देशाने अनेक ‘On-Campus’ उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) प्रशिक्षण दिले, योगासाठी पार्कची उभारणी किंवा आधीच्या पार्कचे नूतनीकरण करण्यात आली, तसेच पुढे योग व कला यांचा समन्वय साधणारे फ्युजन कार्यक्रम (संगीत आणि नृत्य यांच्यासह) घेण्यात येणार आहेत. याशिवाय माय गव्हर्नमेंट (MyGov) व्दारे आयोजित योग विषयक स्पर्धांमध्ये सहभागास प्रोत्साहन तसेच सोशल मीडियावर दररोज योग संबंधी पोस्टद्वारे आव्हान राबवले जातील, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून भित्तीचित्रे काढणे किंवा योगसाधनेसाठी प्रतिबिंब मांडण्यासाठी खास जागा तयार करण्यात येईल, वृक्षारोपण, निसर्गभ्रमंतीसह योग सत्रांचे आयोजन, नैसर्गिक सौंदर्यस्थळांवर सूर्योदयाच्या वेळी योग सत्र, योग सत्रानंतर परिसर स्वच्छता मोहीम, योग व आरोग्यातील परस्परसंबंधांवर आधारित संशोधन सादरीकरण याबरोबरच  योगाचे शास्त्रीय फायदे यावर आधारित शोधनिबंधांचे परीक्षण आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय दृष्टिकोनातून योगाचा अभ्यासास चालना देण्यासाठी संशोधन हॅकाथॉन व तज्ज्ञ परिषदांचे आयोजन केले जाईल, असे सांगितले

योगसाधनेनंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठामध्ये विविध महाविद्यालयात योगा पार्कचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डी एफ राठोड यांनी केले आणि श्री संघर्ष श्रंगारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.