Sunday, June 29, 2025

कृषि विद्यापीठातील कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमातून करीअरच्या उत्तम संधी

डॉ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भ्र.क्र 7588082056 bangalejaya@gmail.com

भारतामधील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये कम्युनिटी सायन्स (सामुदायिक विज्ञान) अभ्यासक्रम राबवला जात असून महाराष्ट्र राज्यातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कम्युनिटी सायन्स हा राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाप्रमाणेच कृषि विषयांतर्गत असणारा सामुदायिक विज्ञान हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो.   इयत्ता १२वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एसस्सी (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्राप्त होते.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता : विद्यार्थ्याने इयत्ता १२वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा याबरोबरच सक्षम विभागाकडून आयोजित करण्यात आलेली एमएचटी सीईटी/जेईई/नीट सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे. या अभ्यासक्रमासाठी मुला-मुलींना प्रवेश खुला असून शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच विद्यार्थीनींना शुल्काच्या बाबतीत असणाऱ्या सर्व सवलती लागू आहेत.

अभ्यासक्रमाचा कायापालट : विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील विविध आव्हाने पेलण्याकरीता सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी गठीत केलेल्या सहाव्या अधिष्ठाता समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरुन अतिशय उत्कृष्टपणे कम्युनिटी सायन्स या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.

अभ्यासक्रमातील प्रमुख विषय : कम्युनिटी सायन्सच्या ४ वर्षाच्या अभ्यासक्रमांतर्गत अन्न व पोषण, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास, रिसोर्स मॅनेजमेन्ट व कन्झुमर सायन्स, अॅपरल अॅन्ड टेक्सटाईल सायन्स, विस्तार शिक्षण व संदेशवहन व्यवस्थापन या प्रमुख क्षेत्रातील पायाभूत विषय,ऐच्छिक विषय, कौशल्यवृध्दी अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार MOOCs, NPTEL, Coursera,  SWAYAW यासारख्या मान्यताप्राप्त पोर्टलवरील ऑनलाईन विषय, इंटर्नशिप, कृषि विषयाशी निगडीत इतर शाखांच्या विषयांबरोबरच मूल्यवर्धित व क्षमता वाढीसाठी व उद्योजकता विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या विषयांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केला आहे. याबरोबरच युवा पिढीला आकर्षित करणारे आधुनिक अभ्यासक्रम जसे की अॅग्रो इन्फॉर्मेटिक्स अॅन्ड आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, कॉम्प्युटर एडेड इन्टेरिअर डिझायनींग, कॉम्प्युटर अॅप्लीकेशन इन अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन विषयांचाही समावेश या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.

कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमातील करिअर संधी : विद्यार्थ्यांमध्ये या विषयासंबधीचे ज्ञान, कौशल्ये तथा नोकरी-व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मक मनोवृत्ती वृध्दींगत करणारा हा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. शासकीय, निमशासकीय तथा अशासकीय स्तरावर विविध क्षेत्रातील संस्था जसे की जिल्हा रुग्णालय, दवाखाना, क्रिडा कार्यालय, व्यायामशाळा, वसतिगृहे, केंद्रिय राखीव पोलीस दल, रेल्वे विभाग इत्यादी ठिकाणी आहारतज्ज्ञ; याबरोबरच महिला व बाल विकास अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बिहेव्हीयर मॉडिफिकेशन थेरपिस्ट, आयसीडीएस पर्यवेक्षक, सामाजिक कार्यकर्ते, बँक तथा भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH) आयसीएमआर - एनआयएन इत्यादी संस्थामध्ये कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.

याबरोबरच या अभ्यासक्रमात स्किल इंडिया मिशनला अनुसरुन स्टार्टअपला देखील भरपूर वाव असून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघरे, आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, इंटेरीअर डिझायनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हॅन्डीक्राप्टस युनिट, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासारखे व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम केले जाते. तसेच अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लॅन्डस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझायनिंग, निवासस्थाने, व्यावसायिक संस्था व दवाखाने, मॉल्स आदींसाठी गार्डन डिझायनिंग, पुष्प रचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको टुरीझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्माण, हाऊस किपींग, पत्रकारिता, व्हिडिओग्राफी, तथा मार्केटींग यासारख्या अभिनव क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअरच्या फार मोठ्या संधी आहेत.

पूर्व - प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील संधी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेशही शालेय शिक्षणात करण्यात आल्याने लहान बालकांच्या शिक्षणास विशेष महत्व देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना पारंगत केले जात असल्याने भविष्यात त्यांना या क्षेत्रातील करिअर करण्याच्या नामी संधी फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.

उच्च शिक्षणाच्या व स्पर्धा परीक्षांसाठी संधी : या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीएसाठी पात्र असून त्यांना नॅशनल अॅकडमी ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेतून बिझनेस एडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रम या व्यतिरिक्त ते त्यांच्या आवडीच्या विषयात जसे की, स्पेशल एज्युकेटर, स्पीच थेरपी, क्लिनिकल न्युट्रीशन, क्लिनिकल सायकॉलॉजी, बाल व कौटंुबिक समुपदेशन, इंटेरिअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, स्कूल कॉउन्सलर इ. डिप्लोमा अभ्यासक्रम करुनही करिअर घडवण्याच्या संधी आहेत.

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांसाठी नोकरी-व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थामधील संधी : किशोर न्यायालय (JJB), केंद्रीय समाज कल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ, युएनडीपी, युएसडी, एफएओ, डब्ल्युएचओ यासारख्या संस्थामध्येही करिअरच्या संधी आहेत.

आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करण्यास वाव : जेष्ठ नागरीकांसाठी डे केअर होम तथा त्यांच्या स्वत:च्या घरीच त्यांच्या घ्यावयाच्या काळजी विषयक सेवा, कुटुंबातील दिव्यांग बालके/व्यक्ती यांच्यासाठी विशेष सेवा व इंटरव्हेन्शन यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही विद्यार्थी आपले करिअर घडवण्याबरोबरच सामाजिक भान ठेवत आपल्या सेवा प्रदान करु शकतात.

महाराष्ट्र शासनाने कम्युनिटी सायन्स अभ्यासक्रम हा कृषि विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य असल्याबाबत तसेच बी.एसस्सी (होम सायन्स) पदवीधारकांना उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी बी.एसस्सी (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स पदवीप्राप्त उमेदवारांनाही उपलब्ध राहतील असे शासन निर्णय निर्गमित केल्याने विद्यार्थ्यांच्या नोकरी-व्यवसायाच्या संधीत वाढ झाली आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी-व्यवसायात तथा वैयक्तिक जीवनात आनंदी व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्ये व सॉफ्ट स्किल्स विकसित करुन एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाकरिताही या अभ्यासक्रमास अनन्यसाधारण महत्व आहे. या महाविद्यालयात सर्व अद्यावत सोयी-सुविधा देखील उपलब्ध आहेत. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाची करिअरच्या बाबतीत असणारी व्याप्ती लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. 

 प्रवेश माहितीसाठी

संपर्क अधिकारी
डॉ. शंकर पुरी
भ्र.क्र ९३२६१०६०३६, ९४०३२४४०४२
संकेतस्थळ : www.mcaer.org