Monday, June 30, 2025

सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ३० जून रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाइन उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू माननीय डॉ. अशोक ढवण उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, उप कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राहुल रामटेके, डॉ.वासुदेव नारखेडे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होत डॉ. सय्यद इस्माईल यांच्या दीर्घ आणि गुणवत्तापूर्ण सेवेची प्रशंसा केली. त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठवाड्यातील सर्वात जुन्या कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी डॉ. इस्माईल यांची निवड ही अत्यंत योग्य ठरली. सध्याच्या कमी मनुष्यबळाच्या परिस्थितीतही विद्यापीठाचा गाडा सक्षमपणे चालवला जात आहे, हे सर्व प्राध्यापकांच्या योगदानामुळे शक्य झाले आहे. त्यांनी प्राध्यापकांनी नैतिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी डॉ. इस्माईल यांच्या द्रवरूप जिवाणू संवर्धक संशोधनातील महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, अधिष्ठाता पदावर असतानाही डॉ. इस्माईल यांनी विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू ठेवले. त्यांनी महाविद्यालयातील तसेच विविध विभागांची 'भारतीय कृषी अनुसंधान परिषदे'कडून मान्यता मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. ते शांत, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी डॉ. इस्माईल यांच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्यातील योगदानाचे विशेष कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. सय्यद इस्माईल यांनी आपल्या सेवेतील सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यात मराठवाड्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्याला प्राधान्य द्यावे. शिक्षकाने आदर्श जीवन जगले पाहिजे. विद्यार्थ्यांनी हार न मानता ज्ञान संपादन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले. हा कार्यक्रम कृषि महाविद्यालय, परभणी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. सय्यद इस्माईल यांचे नातेवाईक, मित्र परिवार, शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधन क्षेत्रातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.