Friday, June 6, 2025

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पुणे भेट — देशी गाय संशोधन केंद्र आणि फुले बेकर्स युनिटला दिली सदिच्छा भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या पुणे येथील कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास  दिनांक ६ जून रोजी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रामध्ये सुरू असलेल्या संशोधन कार्याचा सखोल आढावा घेतला. देशी गायींचे संरक्षण, संवर्धन, रोगप्रतिकारशक्ती, दूध उत्पादन आणि दूधाच्या गुणवत्तेवर आधारित चालू संशोधन प्रकल्पांची माहिती केंद्रातील संबंधित शास्त्रज्ञांनी सादर केली. माननीय कुलगुरूंनी या संशोधन कार्याचे विशेष कौतुक करत देशी गायींच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी उपक्रम राबवावेत, असे मार्गदर्शन दिले.

यानंतर माननीय कुलगुरूंनी कृषि महाविद्यालयाच्या परिसरात कार्यरत असलेल्या फुले बेकर्स या बेकरी युनिटलाही भेट दिली. त्यांनी युनिटमध्ये उत्पादित होणाऱ्या विविध बेकरी वस्तूंचा आढावा घेतला व चव, पौष्टिकता आणि बाजारपेठेच्या गरजांचा विचार करून उत्पादनांमध्ये नवाचार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

ही सदिच्छा भेट संशोधन, शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरली असून विद्यापीठातील संबंधित विभागांना अधिक प्रेरणा देणारी ठरली आहे.