वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी आज दिनांक ३ जून रोजी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला
अभ्यासभेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेतील विविध संशोधन प्रकल्पांची माहिती
संस्थेतील शास्त्रज्ञांकडून घेतली व कार्यपद्धतीचे कौतुक केले.
भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्यात भविष्यात सामंजस्य करार करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या करारातून ऊतीसंवर्धन (Tissue Culture) युक्त उच्च प्रतीची उस रोपे तयार करण्यात येणार असून, विद्यापीठाच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील संशोधन केंद्रात सेंद्रिय उस पद्धतीवर केंद्रित महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प हाती घेतला जाईल. या संशोधनाचे तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विद्यापीठाचा उद्देश आहे. या पुढाकारामुळे शाश्वत ऊस शेतीला चालना मिळणार असून, कृषी व साखर उद्योग यामधील समन्वय वृद्धिंगत होईल, असा विश्वास कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.