Monday, November 16, 2026

२० नोव्हेंबर रोजी वनामकृविचा २८ वा दीक्षांत समारंभ

दीक्षांत समारंभात ३११४ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पत्रकार परिषदेत माहिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी माहिती दिली की, विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या निर्देशानुसार (महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ मधील कलम १८(१) मधील तरतुदींच्या अनुषंगाने) सदर दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि भूषविणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति-कुलपती श्री. दत्तात्रय भरणे हे या समारंभास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे (NAAS) सचिव तथा भाकृअप–भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR-IARI) चे माजी संचालक व माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. अशोक कुमार सिंह हे या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत अभिभाषण करणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर तसेच वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, पंदेकृविचे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख, मफुकृविचे माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे, बासाकोकृविचे माननीय कुलगुरू डॉ संजय भावे, माफसुच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौश्यल्य विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर,  यांच्यासह वनामकृविचे माजी कुलगुरू, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी राज्यसभा सदस्य मा. खा. अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य मा. खा. डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य मा. खा. डॉ. रामाराव वडकुते, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. सईद खान, विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. प्रतापसिंह पाटील, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण, कृषि परीषदेचे उपाध्याक्ष मा. श्री. तुषार पवार, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) चे माजी उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे माननीय सचिव डॉ परिमल सिंग (भाप्रसे), कृषि परिषदेच्या महासंचालक माननीय श्री राहुल रंजन महिवाल (भाप्रसे), महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे माननीय आयुक्त श्री सुरज मांढरे, पद्मश्री श्री श्रीरंग (दादा) देवबा लाड,  कृषि परिषदेचे सदस्य श्री जनार्धन कातकडे, भारतीय कृषि अनुसंधान संस्थेतील वरिष्ठ उच्च पदस्थ अधिकारी, आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ अत्यंत साध्या स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दीक्षांत समारंभात सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकुण ३११४ स्नातकांना पदवी अनुग्रहीत करण्यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे २९ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे २९२ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे २७९३  स्नातकांचा समावेश आहे.

याबरोबरच, कृषी व शेतीपूरक उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीने तसेच ‘कृषिरत्न’ मानद उपाधीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ आणि ‘नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महिला शेतकऱ्यांचाही समावेश असणार आहे.

२८ व्या दीक्षांत समारंभापर्यंत कृषि आणि सलग्न शाखेतील एकूण ७२१०१ स्नातकांचा समावेश आहे. याशिवाय, कृषी पदविका अभ्यासक्रमाची ६१,३८१ प्रमाणपत्रे तसेच उद्यानविद्या अभ्यासक्रमाची १,४२४ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. अशा प्रकारे, एकूण १,३४,९०६ कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीत विद्यापीठाने मोलाचे योगदान दिले आहे.

दीक्षांत समारंभात सन २०२५  – २६ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. एकूण ६४ पदके आणि प्रमाणपत्रे वितरण करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदके, दात्यांकडून देण्यात येणारे १४ सुवर्ण पदके, १ रौप्य पदक आणि १० रोख पुरस्कार प्रमाणपत्रांचे वितरण करण्‍यात येणार असुन २५ पदव्युत्तर पदवी गुणवत्‍ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे, अशी माहिती माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी दिली.

पदवी अनुग्रहीत करण्यात येणाऱ्या स्नातकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या पदवीधरांची नावे विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसुचनेत सुचिबध्द असतील त्यांनाच दीक्षांत दिंडीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. दीक्षांत समारंभाच्या यादीत नाव असणाऱ्या स्नातकांनीच कार्यक्रमास उपस्थित राहावे. या दीक्षांत समारंभाकारिता पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त विद्यापीठातील इतर विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी तसेच इतर मान्यवरांनी इतर मान्यवरांना हा समारंभ विद्यापीठाच्या युटूब https://www.youtube.com/@vnmkv यावर पहाता येईल.

दीक्षांत समारंभास उपस्थित राहणाऱ्या आचार्य पदवी (पीएच.डी.) प्राप्त स्नातकांना तसेच सुवर्णपदके, रौप्यपदके, रोख पारितोषिके व प्रमाणपत्रांसाठी निवड झालेल्या स्नातकांना संबंधित पुरस्कार व पदवी प्रमाणपत्रे समारंभात प्रदान करण्यात येतील. तसेच, इतर सर्व स्नातकांची पदवी प्रमाणपत्रे त्याच दिवशी संबंधित महाविद्यालये व विभागांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.

दीक्षांत समारंभ वेळेवर सुरू होणार असल्यामुळे सर्व संबंधित स्नातकांनी वेळेच्या एक तास अगोदर विद्वत दिंडीत सहभागी होण्यासाठी कार्यक्रम स्थळी यावे.

दीक्षांत दिंडीत प्रत्यक्ष सहभागी होणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, निमंत्रित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वस्त्रसंहिता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यार्थी तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी पांढरा कुर्ता-पायजमा, तर विद्यार्थिनी तसेच महिला अधिकारी व कर्मचारी यांनी क्रीम रंगाचा सलवार-कमीज किंवा साडी व ब्लाउज परिधान करणे बंधनकारक आहे.

हा सकारात्मक बदल यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील अनेक विद्यापीठांनी स्वीकारला असून, या विद्यापीठानेही मागील दीक्षांत समारंभापासून या वस्त्रसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. दीक्षांत समारंभाची गरिमा व शोभा वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने समारंभात सहभागी होणाऱ्या इतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, निमंत्रित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील वरीलप्रमाणे वस्त्रसंहितेचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे.

दीक्षांत दिंडीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रदान करण्यात येणारे विद्या वस्त्र (स्टोल) दीक्षांत समारंभाच्या एक दिवस आधी संबंधित विभागाकडून प्राप्त करून घ्यावे.

पत्रकार परिषदेत संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, सहाय्यक कुलसचिव श्री. सुरेश हिवराळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर गणपत पुरी यांनी केले. या पत्रकार परिषदेत विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.