Wednesday, July 3, 2024

वनामकृविच्या कृषि विज्ञान केंद्राचा १०० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

 कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी  प्रगती साधावी.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली तसेच केंद्राचा १०० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विकास मीना (भाप्रसे), श्री.ब्रिजेश मिश्रा (आयपीएस), विभागीय कृषि सह संचालक डॉ.तुकाराम मोटे, माजी जि.प.अध्यक्ष श्री. पाथ्रीकर, हे होते. तसेच व्यासपीठावर आत्माचे प्रकल्प संचालक श्री. बालासाहेब तौर, शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे, विद्यापीठाचे डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ.सूर्यकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी श्री. प्रकाश पाटील, इफकोचे श्री.सुनील कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करुन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोलताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी शेतकरी देव भव! हे उद्गार वापरुन शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करून शेतकऱ्यांचा सन्मान केला. ते पुढे म्हणाले की, कृषि विद्यापिठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकरी बंधु ‍भगिनींनी आपली प्रगती साधावी आणि उत्पन्न वाढवावे तसेच हे ज्ञान आपल्यापुरते मर्यादित न ठेवता इतरांना द्यावे, यातुन सामाजिक प्रगती होईल. शेतकरी बांधवांनी रासायनिक खताचा वापर शिफारशीनुसारच करावा, याबरोबरच मृद संधारण व जल संधारण करण्यास सहभाग घ्यावा आणि वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जमिनीची धुप रोखण्यासाठी प्रयत्न करावे यातूनच जमिनेचे आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल राखता येईल. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विद्यापिठाच्या स्तरावर विभागीय एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करुन शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठीचे  विभागीय प्रशिक्षणाचे आयोजन भविष्यात करण्यात येईल असे नमूद केले.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रातील कृषि विकासासाठी अद्वितीय कार्य केले. कृषि विद्यापिठाच्या माध्यमातून होणारे संशोधन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. कृषि विद्यापिठातील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले तरच शेतकरी समृद्ध होईल. शेतीला आधुनिकेतेची जोड मिळाल्याने कृषि उत्पादन वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले पारंपरिक ज्ञान आणि अनुभवाला नव तंत्राज्ञाची जोड देणे आवश्यक आहे,  असे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी जिल्ह्यातील ११० शेतकरी (DFI) आणि १४ महाराष्ट्र शासनाकडुन कृषि पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ निर्मित पौष्टिक भाजिपाला बियाणे किट आणि कृषि उद्योजक श्री व सौ लोलगे निर्मित नैसर्गिक किट (गाडुंळ खत, गाडुंळ पाणी व फुले भाजिपाला) किट विमोचन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये एकुण ३६२ अशा मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी सहकुटुंब उपस्थित होते.





वनामकृवितील उद्यानविद्या महाविद्यालायाद्वारा कृषी संजीवनी सप्ताह साजरा

 मा कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांचे एक लाख वृक्षरोपणाचे आव्हान....


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) या उपक्रमांतर्गत  कृषि संजीवनी सप्ताह  'वृक्ष लागवड'  करून दिनांक 03 जुलै  रोजी मौजे. मिरखेल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. व्ही एस खंदारे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. रवी हरणे, सरपंच श्री. थोरवट, प्रगतशील शेतकरी श्री जनार्धन आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे शेतीच्या विकासामधील योगदाना विषयी उपस्थिताना अवगत केले. याबरोबरच जमिनीची धुप रोखण्यासाठी आणि जमिनीच्या  आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, मृद जल संधारणाचे महत्व विशद करून एक लाख वृक्षरोपणाचे आव्हान केले.

कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम हा उपक्रम महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भाग असून या उपक्रमामध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्याबदल माहिती दिली. तदनंतर उपविभागीय कृषी अधिकारी श्री. रवी हरणे यांनी कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेले विविध योजनेचे माहिती दिली. याप्रसंगी  प्रगतशील शेतकरी श्री जनार्धन  आवरगंड यांनी त्यांच्या शेतीमधील अनुभव सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. व्ही एस खंदारे यांनी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. व्ही एस खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) च्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी  उपसरपंच श्री.कैलास देशमुख, मुख्याध्यापक श्री अशोक लोखंडे, ग्रामसेवक श्री राम पवार, आत्माच्या स्वाती घोडके, शितल पोळ यांची उपस्थिती होती.




Tuesday, July 2, 2024

वनामकृविच्या विविध महाविद्यालये आणि कार्यालयाद्वारे हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध महविद्यालये आणि कार्यालयाद्वारे महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. यानिमित्त मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागच्या प्रक्षेत्रावर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि,  शिक्षण संचालक डॉ. उदय  खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्राचार्य डॉ. इस्माईल सय्यद आणि विभाग प्रमुख डॉ प्रवीण वैद्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विभागातील डॉ ए एल धमक, डॉ  आर एन  खंदारे, डॉ एम एस देशमुख, डॉएस एल वाईकर, डॉ एस पी झाडे, डॉ स्नेहल शिलेवांत, श्री इंगोले, कर्मचारी आणि विद्यार्थी  उपस्थित होते.

तसेच कृषि महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या (रावे) कृषि दूत आणि कृषि कन्यामार्फत मौजे टाकळघवाण, पाळोदी, सायना(खटिंग) आणि रायपुर, या गावात वृक्षारोपण, जागरुकता फेरी आणि वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आली होते. ग्राम पातळीवरील कार्यक्रमासाठी संबधित गावचे सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, गावकरी मंडळी आणि शाळेचे विद्यार्थ्यांनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख तथा रावे समन्वयक डॉ. आर. पी. कदम व डॉ. आर. जी. भाग्यवंत यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.जी.नरवाडे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. अनंत बडगुजर, आणि केंद्रप्रमुख डॉ.एस एम उमाटे, डॉ.दळवी, डॉ. चंद्रकांत लटपटे  आणि सबंधित गावच्या रावे कृषि दूत आणि कृषि कन्या  यांनी केले होते.








वनामकृवितील कृषि विस्तार शिक्षण विभागात कृषि दिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथिल कृषि विस्तार शिक्षण विभागात दि. १ जुलै रोजी "कृषि दिन" मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सुरुवातीस महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजन विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागातील प्राध्यापक डॉ. सुनील जक्कावाड, डॉ. प्रविण कापसे, प्रा.राजेंद्र सावंत आणि डॉ. अनुराधा लाड आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमात बोलताना विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी कृषि दिन साजरा करण्याचे महत्व सांगितले आणि वसंतराव नाईक यांच्या राजकीय संघर्षाबरोबरच त्यांनी महाराष्ट्राची कायापालट केली नसून सर्व देशाला नवी दिशा दाखवली असे वर्णन केले. आज कृषिदिनाचे औचित्य साधून विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विविध ठिकाणच्या कृषि महाविद्यालयातील सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या (रावे) ३२०० विद्यार्थ्यामार्फत संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविले जाते, शिवाय त्यांच्याद्वारे आज वृक्षारोपण करून कृषि दिन साजरा केला जात असल्याचे नमूद केले. याप्रसंगी त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपला संशोधनाचा विषय निवडताना शेतकऱ्यांच्या समस्येशी निगडीत निवडावा असे आव्हान केले.
तदनंतर डॉ. प्रविण कापसे यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषि क्षेत्रतिल योगदानाबादल मार्गदर्शन केले. तसेच श्री. विनायक हेगाणा नावच्या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्यांचे अनुकरण करून शेतकऱ्यासाठी कार्य करावे व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दुष्टीने काम करावे असे आव्हान केले. यानंतर प्रा. राजेंद्र सावंत यांनी वसंतराव नाईक यांच्या राजकिय, सामाजिक कार्याबादल माहिती संगितली.
कार्यक्रमात आचार्य पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी गोविंद भोसले, अभिषेक हिवराळे, प्रशिल कांबळे, गौरव गिरी, प्रतीक मडके आणि विद्यार्थीनी युगंधरा पगारे, यांनी महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व कृषि दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अंकुश खांडरे यांनी केले तर आभार रेणुका बांगर यानी मानले.



Monday, July 1, 2024

वनामकृवित हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

 वसंतराव नाईक हे  दूरदृष्टी महान व्यक्तिमत्व...... माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. विद्यापीठातील स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मारकाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, वसंतराव नाईक यांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी अधिक कठीण होता. या काळात अन्नधान्य तुटवडा भासत होता आणि  अन्नधान्याची  आयात करावी लागत असे, तसेच आयात केलेले अन्नधान्यही निकृष्ठ दर्जेचे असे. तेही मिळण्यासाठी राशनच्या दुकानावर गर्दी होवून मोठमोठ्या रांगा लागत होत्या. अशा कठीण काळात खंबीरपणे शेती विकास करण्यासाठी वसंतराव नाईक अग्रगणी राहिले आणि कृषी क्षेत्रामध्ये हरितक्रांती आणली. त्यांनी अन्नधान्यांमध्ये तसेच दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रास स्वावलंबी बनवले.  याबरोबरच १९७२ मध्ये प्रांतवार महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठाची निर्मिती केली व राष्ट्रीय पातळीवर चार कृषि विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. याद्वारे शेतीमध्ये विज्ञानास प्रोत्साहन दिले गेले. त्यांनी जल आणि मृद संधारण साधून शेती मध्ये तसेच रोजगार शैक्षणिक, ग्रामविकास अशा अनेक समस्या सोडविल्या व महाराष्ट्रास  योग्य दिशा दिली. ते दूरदृष्टी आणि महान व्यक्तिमत्व होते त्यांचे आपण सर्वांनी अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे, आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि रावे उपक्रमाचे विद्यार्थी मोठया संख्‍येने  उपस्थित होते. याप्रसंगी कृषि महाविद्यालय परभणीच्या राष्‍ट्रीय सेवा योजनेद्वारे माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते वृक्षलागवड करण्‍यात आली.








वनामकृवितील कृषि महाविद्यालय परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत 'कृषिदिन' साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे दिनांक १ जुलै रोजी  महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत आसेलेल्या  कृषिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीस माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक, डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ, खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर आदींची उपस्थिती होती.

तदनंतर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि मान्यवरांच्या हस्ते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमार्फत महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, नींबू, बकुळ आणि करंज असे विविध झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये योजनेच्या ६० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे नियोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि प्रा. संजय पवार यांनी केले.