प्रादुर्भावाचे तात्काळ निदान करणे आवश्यक ... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या
कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या
क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी -
शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा दहावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा
विषय असून केंद्रीय आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना
दिलासा दिला आहे. यासोबतच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. अतिवृष्टीमुळे
उद्भवणाऱ्या विविध प्रकारचे कीड रोग नियंत्रण, जमिनीतील निचरा करण्यासाठीच्या
विविध उपाय योजना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नियमित मार्गदर्शनातून देत आहेत. कोणत्याही
प्रादुर्भावाचे वेळेतच निदान झाले तर ८० टक्के पिकाची बचत होते आणि उशिरा झाले तर
केवळ २० टक्केच बचत होते, म्हणून किडी व रोगांचे तात्काळ निदान कसे करावे याबाबतही
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. अतिवृष्टीमुळे उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता
आहे त्यासाठी उपाय योजना सुचवाव्यात असे सूचित केले. दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात
वाजता होत असलेल्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाची उपयुक्तता शेतकऱ्यांच्या
समस्या सोडविण्यासाठी वाढत आहे, म्हणून पुढील पंधरा दिवस हा कार्यक्रम दररोज राबवून
जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी मदत करण्यात
येईल. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे
प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.
तांत्रिक सत्रात हवामानाचा अंदाज डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितला. प्रभारी
अधिकारी डॉ. हरीश आवारी यांनी जमिनीमध्ये निचरा ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी पीक
लागवडी पूर्वीच नियोजन होणे आवश्यक असते परंतु सध्या ज्या जमिनीमध्ये पाणी साचलेले
आहे. या ठिकाणी इतर शेतीस अडचण निर्माण होऊ न करता छोटे छोटे चर काढावेत आणि आपल्या
शेतातील पाणी बाहेर काढावे असे सुचविले. कृषी विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार
यांनी सोयाबीन, तूर, कापूस यांच्या सद्यस्थितीतील पिकांचे योग्य संगोपन याबाबत
माहिती दिली. विशेष करून कापूस मर टाळण्यासाठी रासायनिक खताची आळवणी करण्याची तसेच
पीकासजर जमिनीतून खत मिळण्यास अडचण येत असेल तर १३:०:४५ सारख्या खताची पिकावर
फवारणी करावी. याबरोबरच पातेगळ रोखण्यासाठी विविध योजना उपायोजना सुचविल्या.
विभागीय कृषी
सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी त्यांच्या विभागातील अनेक मंडळात अतिवृष्टी झालेली
असून पिकामध्ये जाता येत नाही. पिकांना संरक्षणात्मक उपाय योजना करणे अशक्य होत
आहे. याकरिता ड्रोन-तंत्रज्ञानाचा फवारणीसाठी उपयोग करावा तसेच त्यांनी
शेतकऱ्यांतून आलेल्या वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वसंत-ऊर्जा या प्रॉडक्टमुळे
जमिनीमध्ये कोणताही ताण सहन करण्याची शक्ती निर्माण होते असे शेतकऱ्यांचे
प्रत्याभरणातून आलेले माहिती आहे म्हणून या प्रॉडक्टला शेतकऱ्यांनी वापरण्यासाठी
प्रोत्साहित करावे अशी विनंती केली.
कार्यक्रमात
प्रगतशील शेतकरी श्री विश्वनाथ दहे, श्री. त्रिंबक पाटील यांच्यासह अनेक
शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले त्यास अतिशय योग्य आणि समाधानकारक उत्तरे
विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. सूर्यकांत
पवार, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. हरीश आवारी तसेच विभागीय कृषी सहसंचालक डॉ.
तुकाराम मोटे यांनी उत्तरे दिली.
आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.