ताण सहन करणारे वाण पेरणीसाठी निवडणे आवश्यक ... मा. डॉ. खिजर बेग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय शेती मालिकेचा १२ वा भाग हवामान अंदाज सद्यस्थिती व पीक व्यवस्थापन या विषयावर दिनांक १० सप्टेंबर रोजी कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन संपन्न झाला. प्रमुख उपस्थिती संशोधन संचालक मा. डॉ. खिजर बेग यांची होती. यावेळी बोलताना संशोधन संचालक डॉ. खिजर बेग म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे पर्ज्यन्यमानामध्ये कमालीची अनिश्चितता जाणवते. याकरिता कमी किंवा अधिक ताण सहन करणारे वाण पेरणीसाठी निवडणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे रबी पिकांचे विकसित करण्यात आलेले व विक्रीसाठी उपलब्ध असलेले विविध वाण व त्यांची वैशिष्ट्ये यावरही एका तांत्रिक सत्राचे पुढील कालावधीत आयोजन करावे असे सूचित केले. तसेच अधिकच्या पावसामुळे तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापन यावरही शेतकरी बंधु भगिनी यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे. मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित रबी पीक परिसंवादाच्या निमित्ताने विद्यापीठ विकसित रबी पिकांच्या बियाणांची विक्रीस सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी रबी पीक परिसंवादाचा लाभ घ्यावा आणि बियाणे खरेदी करावी असे आवाहन केले.
तांत्रिक सत्रात कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज व सद्यस्थिती, पाऊसमान, वाऱ्याचा वेग यांचा पिकांवर होणारा परिणाम सांगितला. तसेच या अंदाजानुसार सद्यस्थितीत पीक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ डॉ. आर. एस. जाधव आणि डॉ. अनंत लाड यांनी अधिक पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांवर उद्भवणाऱ्या किडी व रोगांच्या समस्या व त्यांचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या सूचनेनुसार दुहेरी संवादावर अधिकचा भर देण्यात आला होता. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह सातारा, अकोला, नागपूर, येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतीविषयक समस्या विचारल्या. विशेष म्हणजे अडीच तास चाललेल्या या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्यांचे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. आर. एस. जाधव आणि डॉ. अनंत लाड यांनी उत्तरे देऊन समाधान केले.
कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंग, यु टूब, फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.