Tuesday, September 3, 2024

सद्यस्थितीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

शंका समाधानावर भर देण्याच्या कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या सूचना 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर रोजी सद्यस्थितीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित केले. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे खरीपाचे पिके संकटात आली आहेत. पिकांचे सध्या योग्यपद्धतीने काळजी घेण्यासाठी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शंका समाधानावर भर देण्याचे सूचित केले. कार्यक्रमासाठी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तथा विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी सद्यस्थितीत सोयाबीन पिकाची अवस्था. सोयाबीन पिवळे पडणे समस्या व त्याचे व्यवस्थापन. फुलांचे शेंगात रुपांतर व शेंगा भरणीसाठी आवश्यक उपाययोजना. पाणी व्यवस्थापन व निचरा कसा करावा, संभाव्य कीड, रोग व पिक संरक्षण. अन्नद्रव्य कमतरता व व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगितल्या.

कार्यक्रमामध्ये बहुसंखेने शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी पिकामध्ये साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या परिणामाविषयी समस्या मांडल्या त्यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ हरीश आवारी, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे यांनी उत्तरे देऊन समाधान केले.

कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि  मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंग, यु टूब, फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.