Wednesday, September 4, 2024

माननीय कृषी मंत्री ना श्री धनंजयजी मुंडे यांची वनामकृवित आढावा बैठक

 


मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कृषि मंत्री ना श्री धनंजयजी मुंडे परभणीच्या दौऱ्यावर दिनांक ४ ऑगस्ट रोजी आले होते. यादरम्यान त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट दिली. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी माननीय कृषि मंत्री ना श्री धनंजय मुंडे यांचे ऑनलाईन स्वागत केले. तसेच माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांना प्रतिष्ठित अभियंता पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य मा. श्री राजेश विटेकर, माजी आमदार मा श्री  मधुसूदन केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री जीवराज दापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये माननीय कृषि मंत्री ना. श्री धनंजयजी मुंडे यांनी विद्यापीठाने अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे रक्षणाकरिता आणि सद्यस्थितीत पीक व्यवस्थापनासाठी  केलेल्या कार्याचा आढावा घेतला व पुढे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून स्वयंचलीत शेती विकसित करावी तसेच ड्रोनद्वारे फवारणीबाबत चर्चा करून ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने सध्या आकारलेला दर कमी करावा. ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा असे नमूद केले. पिकांच्या उत्पादनामध्ये नॅनो खतांमुळे उत्पादन खर्चात ६० टक्के बचत होईल आणि उत्पादनात  ५० % नी वाढ होवू शकते असे नॅनो खतांचे महत्त्व असल्याने नॅनो खताच्या वापरास चालना द्यावी. या विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे पिकांच्या पोषक तत्त्वांच्या ड्रोन-आधारित अनुप्रयोगांसाठी, ज्यात नॅनो फॉर्म्युलेशनचा समावेश आहे, यासाठीचे मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित करण्यासाठीच्या ड्रोन समितीचे अध्यक्ष असल्याने नॅनो खते मोफत देण्यासाठी शिफारस आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार द्यावा. याबरोबरच सोयाबीन उत्पादनामध्ये सोया मिल्क म्हणून उत्पादित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षिता आणि प्रमाण संस्था, यांच्याकडे पाठपुरावा करावा. याबरोबरच विद्यापीठांमध्ये बांबू लागवडीसाठी चालना देण्यासाठी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर तसेच रस्त्यालगत बांबूची लागवड करावी अशा सूचना दिल्या.

यावेळी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी बिजोत्पादनासाठी विद्यापीठाने साडेतीन हजार एकर जमीन विकसित केल्याचे तसेच महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर बाबत माहिती दिली. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाचे बीजोत्पादन मागील वर्षी १०२०० क्विंटल झाले होते. यावर्षी हे लक्ष दुपटीने करून २०००० क्विंटलवर नेहण्यात येईल व भविष्यात ५०००० क्विंटलचे लक्ष निर्धारित केल्याचे सांगितले तसेच विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाने विदेशातील व देशातील अग्रगण्य विद्यापीठे व संस्थेसोबत सामंजस्य  करार केले असुन याचा लाभ कुशल मनुष्यिबळ निर्मिती करण्या्स होणार असल्याचे नमूद केले. तसेच विद्यापीठ शेतकरी केंद्रित कार्य करत असून नियमित विस्तार कार्या बरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद घडवून आणला जातो. याबरोबरच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू पासून ते विद्यापीठाच्या सर्व कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांसाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबतहा विशेष उपक्रम राबवत आहेत असे सांगितले.

कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर यांनी विद्यापीठाचा महसूल वाढ होण्याच्या दृष्टीने बीजोत्पादन प्रकल्प, उती संवर्धित केळी आणि उसांच्या रोपांना मागणी असल्याने या प्रकल्पांना मंजूर देण्याची विनंती केली. यावेळी नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता  डॉ सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर डी क्षीरसागर, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. राजेश कदम, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, लातूर विभागाचे कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ आदींची उपस्थिती होती.