Sunday, September 29, 2024

वनामकृवित शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा आणि सोयाबीन शेती दिन साजरा

 


कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

सहाय्यक महासंचालक मा. डॉ. डी. के. यादवा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्राद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांची  कार्यशाळा आणि सोयाबीन शेती दिन दिनांक २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या बियाणे विभागाचे सहाय्यक महासंचालक मा. डॉ. डी. के. यादवा, विशेष अतिथी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय बियाणे शास्त्र संस्थेचे संचालक मा डॉ. संजय कुमार हे होते. व्यासपीठावर नवी दिल्ली येथील केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपायुक्त मा. डॉ दिलीप कुमार श्रीवास्तवा हे कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून तर इल्कोम्पोनिक्स सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री सत्येंद्र एन द्विवेदी, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बीज उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड अमोल रणदिवे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या बीज वितरण प्रणाली मधील महत्त्वाचे समजले जाणारे बीज प्रतीक चिन्ह, बीज परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त आयएसओ प्रमाणपत्र आणि संभाजीनगर येथे झालेल्या बियाणे कार्यशाळेच्या प्रोसिडिंगचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची विद्यापीठास योग्य सहकार्य लाभत आहे. विद्यापीठ विकासात ड्रायव्हर ते डायरेक्टर यांची सर्वांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांना दर्जेदार आणि पुरेसे बियाणे मिळण्याच्या दृष्टीने यावर्षी नव्याने विकसित ६०० हेक्टर जमिनीसह एकूण ८०० हेक्टर वर सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे. तसेच बिजोत्पादन कार्यक्रमास सिंचन सुविधा उपलब्ध करून सिंचन संरक्षणही देण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपन्या विद्यापीठ विकसित बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यापीठ आपल्या प्रक्षेत्रावर सर्व उत्पादने घेऊन त्याचे निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रात्यक्षिक आयोजित करत आहे. सोयाबीन सारख्या महत्त्वपूर्ण वाणांमध्ये बियाणे आणि वाण बदल यावर भर देऊन संशोधन  कार्य करण्यात येईल. विद्यापीठाची बियाणे तपासणी प्रयोगशाळेस राष्ट्रीय पातळीवर मानांकन मिळवून भारतीय बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे सदस्य बनण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

सहाय्यक महासंचालक मा. डॉ. डी के यादवा यांनी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या काळात विद्यापीठाने जमीन विकसित करून बीजोत्पादन कार्याची प्रशंसा करून त्यांच्या कार्याच्या गौरव केला. सोयाबीनमध्ये वाण, बियाणे बदलाच्या कार्यासाठी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. आजपर्यंत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने विकसित केलेल्या वाणामध्ये जवळपास ८५ टक्के हवामान अनुकूल वाण विकसित केलेले आहेत. तसेच देशातील कुपोषणाचा आणि व्यक्तीमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे अनेक पिकामध्ये जैवसंतृप्त वाण विकसित केले असून यामध्ये वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाने ज्वार आणि बाजरा या पिकांच्या जैवसंतृप्त वाणाच्या विकासामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रामध्ये शेतीची प्रांतवार रचना करून चार विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली. या चारही विद्यापीठाद्वारे स्थळनिहाय पिकांचे जवळपास ५८० विविध वाण विकसित करण्यात आले. यापैकी या विद्यापीठाने १५० वाण दिले आहेत. विद्यापीठ मूलभूत ते सत्यतादर्शक किंवा प्रमाणित बियाणापर्यंतच्या साखळीमध्ये उत्कृष्ट बियाणे देण्यात महत्त्वपूर्ण व अचूक योगदान देत आहे. विद्यापीठांच्या या वाणामुळे देशाची खाद्यतेला सह इतर शेती उत्पादनाची आयात थांबवण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली.

यावेल बोलताना संचालक मा डॉ. संजय कुमार म्हणाले की, शेतीमध्ये हवामान बदलामुळे किडी, रोग, अतिवृष्टी, सिंचन समस्या वाढत चाललेल्या आहेत. लोकसंख्या वाढत असून साधन संपत्ती कमी होत आहे. भारत खाद्यतेलाची आयात करत आहे. खाद्यतेलाचे निर्मिती होण्यासाठी उत्कृष्ट तेल बियाणे उपलब्ध करावे लागेल. यासाठी सोयाबीन विषयावरील शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यशाळा लाभदायक ठरेल. विविध पिकांचे वाण, बियाणे यामध्ये फायद्याचे बदल होणे बदल करून नवनवीन वाण विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी शासन, विद्यापीठ आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे आहे असे नमूद केले

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपायुक्त मा. डॉ दिलीप कुमार श्रीवास्तवा यांनी केंद्र शासनाच्या बीजोत्पादनासाठी असलेल्या साथी या पोर्टलची माहिती दिली. या पोर्टलमध्ये मुलभूत ते प्रमाणित बियाणे श्रंखलेतील बीजोत्पादन कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती निदर्शनात येते. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे एक अग्रगण्य राज्य असून साथी या कार्यपद्धतीचा महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने अवलंबन करण्यात येते. याबरोबरच बियाणे निर्यातीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे कार्य राष्ट्रीय पातळीवरील बियाणे संस्थेद्वारे केले जाते. या कार्यात महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण मंडळ हे एक सदस्य आहे. याद्वारे शेतकऱ्यामार्फत दर्जेदार बियाण्याची निर्मिती करून बियाणे निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करणे आवश्यक आहे. बीजोत्पादन झाल्यानंतर राज्य पातळीवरील बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे तपासलेल्या बियाणाचा ५ टक्के  नमुना बनारस येथील बीज तपासणी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यादृष्टीने बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या राज्य पातळीवरील प्रयोगशाळा मानांकित असणे आवश्यक आहे. याकरिता विद्यापीठाने विद्यापीठाची बीज तपासणी यंत्रणा मानांकनासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावा अशी विनंती त्यांनी केली.

इल्कोम्पोनिक्स सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री सत्येंद्र एन द्विवेदी यांनी आहारामध्ये सेंद्रिय आणि सात्विक घटकांना महत्व देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती चालना द्यावी. महाराष्ट्रामध्ये गुळाची निर्मिती अधिक होते. याचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील विविध शेतकरी उत्पादक संघटनेसोबत सेंद्रिय गुळ उत्पादन करण्यासाठी सामंजस्य करार करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कार्य भविष्यात करण्यात येईल असे नमूद केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सोयाबीन सह विद्यापीठाने विकसित वाणाची माहिती देऊन शेतकऱ्याच्या विकासातील विद्यापीठाचे कार्य नमूद केले. विद्यापीठाचे बियाणे अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणेच्या दृष्टीने विद्यापीठाने यावर्षी ८०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेऊन शासकीय यंत्रणा आणि शेतकरी उत्पादन कंपन्याद्वारे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाईल असे नमूद केले.

बीज उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड अमोल रणदिवे यांनी शेतकरी उत्पादन कंपन्यांचे बीजोत्पादन कार्य विशद केले. बीजोत्पादन घेण्यासाठी सर्व स्तरावर योग्य सहकार्य मिळून पैदासकार बियाणे कंपन्यांना विद्यापीठाकडून मिळते. राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने बीज उत्पादक कंपन्यांना मिळणाऱ्या अनुदानाचा प्रश्नही मार्गी लागला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचा एम ए यु एस ७२५ आणि तुरीचे  बीडीएन ७११, बीडीएन ७१६, गोदावरी यासारखे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. या वाणाचे शेतकऱ्यांच्या शेतावर विक्रमी उत्पादन होत असून सोयाबीनचे १९ क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेतल्याचे नमूद केले.

दुपारच्या सत्रात मान्यवरांची आणि शेतकरी उत्पादक कंपन्याच्या सदस्यांची विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर पेरलेल्या सोयाबीन प्रक्षेत्रास शिवार फेरी आयोजित करून विद्यापीठाचे सर्व वाण दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोयाबीन पैदासकार डॉ एस एम उमाटे यांनी केले . यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर बी क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (बियाणे)  डॉ. हिराकांत काळपांडे, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रमुख आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत उपस्थित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्यांनी सोयाबीन मधील विविध मुद्द्यावर प्रश्न विचारले यास मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रीतम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. आर एस जाधव यांनी मानले.

 

संचालक मा डॉ. संजय कुमार 

उपायुक्त मा. डॉ दिलीप कुमार श्रीवास्तवा 

व्यवस्थापकीय संचालक श्री सत्येंद्र एन द्विवेदी



कार्यशाळेच्या प्रोसिडिंगचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

बीज प्रतीक चिन्ह, व बीज परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त आयएसओ प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते विमोचन