सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम
परभणी : वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन
आणि विस्तार कार्यात भरीव योगदान असून आजपावेतो विद्यापीठांतर्गत ५०,००० पदवीधर व जवळपास ४५,००० पदविका धारक
विद्यार्थ्यांनी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्याने सामाजिक प्रगती घडवून
आणण्यासाठी त्यांची मोलाची भूमिका असल्याचे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि
यांनी केले. या विद्यापीठातील विद्यार्थी प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर
सेवा बजावत असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी विशद केले.
व्यक्तीच्या शिक्षणापेक्षाही त्याच्या चारित्र्याला अधिक महत्त्व असून त्यांच्या
अंगी शिस्त असेल तरच ते आपल्या जीवनात उत्कर्ष साधू शकतात. विद्यापीठाच्या
प्रत्येक विद्यार्थीने समाजात रोल मॉडेल होण्याकरिता अथक प्रयत्न करण्याची नितांत
गरज असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादित केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात
नवप्रवेशित प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी दिक्षारंभ कार्यक्रमाच्या
निमित्ताने आयोजित “विद्यार्थी- शिक्षक-पालक सुसंवाद”
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्यांनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी
संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी या शैक्षणिक वर्षापासून
विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण आवलंबिले जात असून या धोरणामध्ये भारतीय शिक्षण
पध्दती प्रमाणे अमुलाग्र बदल घडवून आणले जात असून हे शिक्षण जास्तीतजास्त
व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित करण्यात आले आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच हे
शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण करत असतांना आपल्या विविध कला-गुणांना वाव
देऊन प्रत्येक शैक्षणिक कार्यात तसेच क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे असे
विचार त्यांनी मांडले.
सामुदायिक
विज्ञान विषयाचा नवीन अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या ज्ञान व कौशल्याच्या कक्षा
रुंदावण्यासाठी अतिशय उपयुक्त असून जीवनातील विविध आव्हाने पेलण्याकरिता त्यांना
सक्षम करण्यासाठीही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी आपल्या
प्रास्ताविकात स्पष्ट केले.तसेच या महाविद्यालयाची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया
यशस्वीरित्या राबवून महाविद्यालयास मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेशित
होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याबद्दल
प्रवेश प्रक्रिया समिती अध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांचे या प्रसंगी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यींनी स्नेहा भदर्गे व गायत्री जोशी यांनी या अभ्यासक्रमाविषयी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. पालक प्रतिनिधी श्री. माणिक रासवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. नीता गायकवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ, अ.भा.स.सं.प्र. कृषिरत महिला, पाल्य प्राध्यापक डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. अश्विनी बिडवे, यांच्यासह पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमास डॉ.सुनीता काळे,डॉ. विजया पवार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर पुरी,डॉ. आश्विनी बेद्रे,प्रा. प्रियंका स्वामी, प्रा. स्वाती गायकवाड, प्रा. ज्योती मुंडे,प्रा मानसी बाभुळगावकर तथा विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.