Tuesday, September 17, 2024

वनामकृवितील रबी पीक परिसंवादास उस्फुर्त प्रतिसाद

विद्यापीठाचे विस्तार कार्य व्यवस्था केंद्रित... कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि

अचूक शेती पद्धती अवलंबणे आवश्यक .... माजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह 

आपणच आपल्या शेतीचा उत्पादनाचा भाव ठरवायचा... कर्नल श्री सुभाष दैशवाल

कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि

माजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह

कर्नल श्री सुभाष दैशवाल

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रबी पिक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि हे होते. मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल हे उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे विद्यापीठाचे एक प्रमुख कार्य आहे. यासाठी माजी कुलगुरू मा प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात आणि शेती उद्योगातील यशस्वी, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यांच्या आदर्श  मराठवाड्यात रुजवून त्यांचे अनुकरण करण्यासाठी विद्यापीठ कार्य करेल. या दृष्टीनेच विद्यापीठाचे शेतकरी केंद्रित विस्तार कार्य सुरू आहे. शेतकऱ्यांचे यश अपयश समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यापीठ प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात (साधारणपणे बुधवारी) शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा अभिनव उपक्रम राबविते. शेतकऱ्यांचे म्हणणे व समस्या समजून घेण्यासाठी आठवड्यातून दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद घडवून आणला जातो. शेतकऱ्यासाठी कुलगुरू कार्यालयासह विद्यापीठाचे द्वार सतत खुले ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाचे विस्तार कार्य हे व्यक्ती केंद्रित नसून व्यवस्था केंद्रित आहे. विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांच्या सदैव सन्मान करण्यात येतो, असे नमूद केले. 

माजी कुलगुरू मा प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह म्हणाले की, हवामान बदलामुळे शेतीमध्ये तापमान वाढ आणि पर्जन्यमानामध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे. यातून शेतीचे नुकसान होत असते, यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमाची आणि नियोजनाची माहिती दिली. भविष्यात हवामान बदलाची समस्या अधिक वाढू शकते. पहिली हरितक्रांती ओलिताखालील शेतीमध्ये झाली, परंतु दुसरी हरितक्रांती पर्जन्यमानावर आधारित असलेल्या कोरडवाहू शेतीमध्ये येणार आहे. यासाठी अचूक शेती पद्धती अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी शेती व्यवसायास ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. तसेच उत्कृष्ट दर्जाची बियाणे, पाणी आणि अन्नद्रव्याचा काटेकर वापर व योग्य वापर, योग्य मशागत, स्वयंचलित शेतीसाठीच्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. याबरोबरच जलसंधारणास प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचे साठवणूक करावी. पाण्याचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने एकात्मिक शेतीस प्राधान्य द्यावे असे नमूद केले. 

मा. कर्नल श्री सुभाष दैशवाल यांनी शेतकऱ्यांच्या भाषेत बोलताना नमूद केले की, गाजर या पिकाचे उत्पादन व विक्री करताना सुरुवातीस व्यापाऱ्याकडून शोषण झाले. यातून दिशा ठरवून आपणच आपल्या शेतीचा उत्पादनाचा भाव ठरवायचा ही प्रेरणा घेवून गट शेती करण्याचा निर्णय घेतला. शाश्वत शेती व्यवसायासाठी योग्य शिक्षणाची गरज असते. कृषी शिक्षण हे सर्व शिक्षणाचे एकरूप आहे. शेतीसाठी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञानकला, सामाजिक शास्त्रे, पासून ते वाणिज्य पर्यंत ज्ञान असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्वतः शेतीचे योग्य ज्ञान घेऊन शेतीमध्ये तज्ञ होणे आवश्यक आहे. गट शेतीतून आपसातील ज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ करून घेता येतो. शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरणाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जमीन धारणा मोठी असणे आवश्यक असते म्हणून गट शेती लाभदायक ठरली. सुरुवातीला सर्वसाधारणपणे जे घडते तेच घडले आणि शेती व्यवसायात कर्जबाजारी झालो. परंतु परत जोमाने उभा राहून गाजराची गट शेती उभारली. यासाठी १०० कोटींच्या मूलभूत सुविधा उभारल्या असून यामध्ये २५००० टनाचे शीतगृहाचा प्रामुख्याने समावेश आहे. याद्वारे जवळपास १०००  कुटुंबाचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावले आहे. शेती या व्यवसायात स्पर्धा नाही. यातून खूप मोठा मान सन्मान मिळत आहे. शेतकरी राजकार्ते, अधिकारी, व्यापारी यांना दोष देतो, परंतु आपणच आपल्या शेतमालाचे उत्पादन गुणात्मक, दर्जेदार,  संख्यात्मक असे भरपूर प्रमाणात करून आपली विश्वासहर्ता वाढविण्यास प्राधान्य द्यावे व यशस्वी व्हावे. पवित्र अशा शेती उद्योगास स्वतःला झोकून द्यावे. कुटुंबातील किमान एका व्यक्तीने तरी शेती व्यवसायाकडे वळावे. या कार्यक्रमातून माझ्यासारख्या किमान चार-पाच शेतकऱ्यांनी तरी गट शेती करण्याचा निर्णय घ्यावा आणि माझ्यासारखे बनावे ही आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि विद्यापीठाच्या विस्तार कार्याबद्दल माहिती दिली. शेतकरी कन्या स्नेहल हरकळ हिने परखड शब्दात शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या. परिसंवादाच्या निमित्ताने कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले होते यास शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विद्यापीठांच्या शास्त्रज्ञाद्वारे लिखित पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. याबरोबरच बी  हंगामासाठी बियाणे विक्रीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कार्यक्रमात कोरडवाहू शेतीतील विविध  आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे जिल्ह्यातील पाच युवा शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. प्रीतम भुतडा यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

तांत्रिक सत्रात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव यांनी हरभरा लागवड, डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी रबी तेलबिया लागवड, डॉ. प्रीतम भुतडा यांनी रबी ज्वारी लागवड, डॉ. सुनील उमाटे यांनी गहू लागवड डॉ. विश्वनाथ खंदारे रबी भाजीपाला लागवड, डॉ. गजेंद्र लोंढे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, डॉ.  गजानन गडदे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनी सद्य परिस्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन, डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी फळबाग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. वन्य जीव प्राण्यापासून होणारे शेतीचे नुकसान आणि मानवी हानीच्या भरपाई साठी  असलेल्या विविध कायद्याचे आणि मदतीचे बद्दल निवृत्त वनक्षेत्र सहाय्यक अधिकारी  श्री शिवाजी गिरी यांनी मार्गदर्शन केले. शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमामध्ये सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी यांच्यासह एक हजाराहून अधिक शेतकरी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर जवळपास १४०० ऑनलाईन अशा एकूण २४०० शेतकऱ्यांनी सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला.