Saturday, September 7, 2024

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे सद्यस्थितीत कापूस पिकाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

 शेतकऱ्यांना सद्यस्थितीत अचूक व नेमके तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ सप्टेंबर रोजी सद्यस्थितीत कापूस पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी माननीय कुलगुरू म्हणाले की, कार्यक्रमात दुहेरी संवाद ठेवून शेतकऱ्यांना सद्यस्थितील शेतीसमस्या विचारून त्यावर सोप्या पद्धतीने अचूक व नेमके तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे. या संवादाची उपयुक्तता वाढत असल्यामुळे विद्यापीठाद्वारे पुढील पंधरा दिवस नियमित कार्यक्रम घेण्यात येतील. सध्या शेती मध्ये व्यवस्थापनासाठी जाता येत नाही, याकरिता विद्यापीठाने माफक दरात ड्रोन फवारणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी सद्यस्थितीत कापूस पिकाची अवस्था. डोमकळी, पातेगळ होणे समस्या व त्याचे व्यवस्थापन. बोंडे विकसित होण्यासाठी उपाययोजना. संभाव्य कीड, रोग व पिक संरक्षण. अन्नद्रव्य कमतरता व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी यांनी जमिनीमध्ये वापसा येण्यासाठी निचरा ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी पीक लागवडी पूर्वीच नियोजन होणे आवश्यक असते परंतु सध्या ज्या जमिनीमध्ये पाणी पातळी वाढली आली आणि जमिनीच्या मुळासी पाणी साचलेले आहे. या करिता इतर शेतीस अडचण निर्माण होऊ न करता छोटे छोटे चर काढावेत आणि आपल्या शेतातील पाणी बाहेर काढावे. तसेच आपल्या बोअर आणि विहिरीतील पंप सुरु करून जमिनीतील पाणी बाहेर नाल्यात सोडावे असे सुचविले.

कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि  मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमामध्ये बहुसंखेने शेतकरी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीविषयक विविध  समस्या मांडल्या त्यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ, डॉ हरीश आवारी, डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. आनंद गोरे यांनी उत्तरे देऊन समाधान केले. तसेच प्रयोगशील शेतकरी श्री अनिल सूर्यवंशी यांनी नियंत्रणासाठी तयार केलेला प्रकाश सापळा दाखवून त्याची उपयुक्तता नमूद केली. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंग, यु टूब, फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.